
सामना ऑनलाईन । कवठे येमाई
राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील जनता देखील पाण्यासाठी हवालदिल झाली आहे. त्यामुळे येथील महत्त्वाच्या जलस्रोतांचे प्रशासनाने तातडीने नियोजन करून, पशुधन, पिण्याच्या पाण्यासाठी वितरीत करावे. तसेच घोडधरणातून रांजणगाव औद्योगिक वसाहतीसाठी होणारा पाणी पुरवठा त्वरित बंद करावा. अन्यथा 5 जून पासून शिरुर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसणार असल्याचा इशारा शिरुर-हवेलीचे माजी आमदार अँड.अशोक पवार यांनी दिला आहे.
शिरुर तालुक्यात चासकमान कालव्याच्या पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरुरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. न्हावरे, कोकडेवाडी, उरळगाव, निर्वि या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. पाण्याच्या चुकीच्या वितरणमुळे पूर्व भागातील शेतकर्यांना फटका बसला असून, दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच चिंचणी येथील घोड धरणातून 24 तास एक्सप्रेस फीडरद्वारे रांजणगाव औद्योगिक वसाहतीसाठी घोड धरणातील मृत पाणी साठ्याचा अहोरात्र उपसा सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास घोड धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे घोड धरणातून औद्योगिकरणासाठी होणारा पाणी पुरवठा तातडीने बंद करून पिण्याच्या पाण्यासाठी धरणातील साठा आरक्षित करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, संबंधीत विभाग व शिरुर पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती पवार यांनी दिली.

























































