माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवाकर रविवारी सकाळी शीव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सरदार तारासिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सरदार तारासिंह हे सुरुवातीपासून भाजपमध्ये कार्यरत होते. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असतानाच सरदार तारासिंह हे लोकप्रिय होते. पक्षाने 1999 मध्ये त्यांना पहिल्यांदा विधानसभेवर जाण्याची संधी दिली. या संधीचे त्यांनी सोने केले. 1999 ते 2019 अशी सलग 20 वर्ष त्यांनी विधानसभेत मुलुंडचे प्रतिनिधित्व केले. आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत तारासिंह यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. कामाच्या झपाटय़ामुळे त्यांच्या नावापुढे कार्यसम्राट अशी बिरुदावली लागली होती. दरम्यान, सरदार तारासिंह यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. तारासिंह यांच्या निधनाने जनसामान्यांचा नेता, एक सच्चा समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या