
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
मुख्याध्यापक संजय मालवणकर यांची बडतर्फी आम्ही मागे घेतलेली नाही. बडतर्फी हा सर्व संचालकांनी घेतलेला निर्णय आहे. मात्र, १४ जानेवारी रात्री जमावाने धमकी देत जबरदस्तीने मालवणकर यांची बडतर्फी मागे घेत असल्याचे संस्था पदाधिकारी यांच्याकडून लिहून घेतले होते. ते आम्हाला मुख्याध्यापक म्हणून मान्य नाहीत. त्यांना या पदावरून आम्ही कायदेशीर मार्गाने उतरू, अशी भूमिका वेताळ-बांबार्डे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शशिकांत अणावकर यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात जाहीर केली.
संस्थेच्या शिवाजी इंग्लिश स्कुल, पणदूर या प्रशालेच्या मुख्याध्यापकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी १४ जानेवारी रोजी नागरिकांनी आंदोलन छेडले होते. त्यामुळे शाळेचे नियोजित वार्षिक स्नेहसंमेलन रद्द करण्यात आले होते. तर त्याच दिवशी रात्री उशिरा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक मालवणकर यांना पुन्हा सेवेत घेत असल्याचे लेखी दिले होते. याबाबत अणावकर यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, सचिव रघुनाथ गावडे, सदस्य डॉ अरुण गोडकर, नागेंद्र परब, शिवराम अणावकर, रिना सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अणावकर यांनी, मुख्याध्यापक मालवणकर यांचे गेल्या तीन वर्षातील काम असमाधानकारक आहे. त्यामुळे २६ ऑगस्ट २०१६, २४ एप्रिल २०१७, ६ मे २०१७ या तारखेला तीन नोटिसा दिल्या. मात्र त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना १३ मार्च २०१८ रोजी आपला पदभार पर्यवेक्षक यांच्याकडे देण्याची नोटीस बजावली. त्याला त्यांनी क्रिमिलर न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे ३ मे २०१८ रोजी हि नोटीस मागे घेतली. मात्र, त्यानंतर त्यांनी संस्थेला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. मालवणकर यांच्या कारकिर्दीत शाळेचा निकाल दर्जात्मक कमी झाला. ते स्वतः पी ई चे शिक्षक असताना आतापर्यंत एकदाही एकही विद्यार्थी त्यांच्यामुळे विभागस्तरीय पातळीवर खेळू शकलेला नाही. तसेच सध्या ते दहावीचा एकही विषय शिकवू शकत नाही. तसेच नेहमीच ऑडिट पाईंट निघत आहेत. संस्थेचे पैसे त्यांनी वर्षभर वापरले आहे. विद्यार्थी प्रवेश शुल्क ते नियमित भरत नाहीत. हिशोब घेण्याचा प्रयत्न केल्यास मी हिशोब देण्यास बांधील नसल्याचे सांगतात. स्कुल कमिटी सभा लावताना संस्थेला सांगत नाहीत. आम्ही दानशूर व्यक्तीकडून ४ कोटी रुपये निधी उपलब्ध करीत अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या. आमच्या शाळेचा पट १८०० आहे. पण गेल्या तीन वर्षात यांच्यामुळे १३४ मुले कमी झाली. ते सोळा वर्षे आमच्याकडे सेवेत आहेत. त्यावेळी आमची तक्रार नव्हती. पण मुख्याध्यापक म्हणून त्यांचे काम प्रशालेला विकासाकडे नेणारी नाही. त्यामुळे त्यांना आम्ही बडतर्फ केले असे सांगितले.
२० टक्के अनुदान मिळाले नाही
मालवणकर यांनी शासनाने सुरु केलेल्या २० टक्के अनुदानसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यामुळे संस्थेचे व पर्यायाने शिक्षकांचे व शाळेचे नुकसान झाले आहे, असे सांगतानाच अणावकर यांनी आंदोलन करणारे माझे शिष्य आहेत. मी ५० वर्षे संस्थेसाठी राबलो. संस्था मोठी करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात आमच्या एवढी विकसित शाळा नाही. तरीही संस्थेला नालायक म्हटल्याने वाईट वाटले. मला दोष दिल्याचे वाईट वाटले नाही, असे सांगितले.




























































