
सामना प्रतिनिधी । नागपूर
गडचिरोली जिल्हयातील सिंरोचा येथील एका सुशिक्षित युवकांने ब्लॅकराईसचे उत्पादन घेवून एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. आदिवासी दुर्गम भागात हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे, कमी खर्चात ब्लॅक राईसचे उत्पादन मिळत असल्याने धान उत्पादक शेतकायांनी त्याचे कौतुक केले आहे,
लक्ष्मण राजबाबू पेदापल्ली, असे या युवकाचे नाव असून, तो सिरोंचा तालुक्यातील रहिवासी आहे. लक्ष्मणने शुगर फ्री व ब्लॅक राईसच्या माध्यमातून हरितक्रांती घडवून यशस्वी शेतकरी होण्याचा मान पटकाविला आहे.
लक्ष्मण नागपूर येथे संगणकशास्त्रात पदव्युत्तर प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. तसाही संगणकशास्त्र आणि शेती यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. परंतु त्याने अचानक गावात येऊन यशस्वी शेतकरी होण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ब्लॅक राईसचे उत्पादन मणीपूर राज्यात होत असून, या राईसचे अनेक फायदे असल्याचे त्याच्या वाचनात आले. त्यानंतर त्याने मागील वर्षी मणीपूर गाठले व तेथून दोन किलो ब्लॅक राईस आणून त्याची शेतात एक-एक दाणा रोवून लागवड केली. वैशिष्ट्य म्हणजे, ९० दिवसांत त्याला पीक प्राप्त झाले. एका धानाच्या रोपाला ४३.७५ ग्रॅम उत्पादन येऊन प्रति हेक्टरी ७२.३५ किलो ब्लॅक राईस मिळाले.






























































