
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वत्र प्रचाराचा धुराडा उडाला आहे. सोशल मीडियावरही विविध पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून प्रचार करताना दिसत आहेत. आता फेसबुकही या रंगामध्ये रंगले असून दोन नवीन फीचर्स लॉन्च केली आहे. या फीचर्सद्वारे युझर्सला आपल्या भागातील उमेदवारांची माहिती मिळणार आहे.
देशभरातील मतदारांशी संपर्क; फेसबुक, व्हॉट्सअॅपवर 87 हजार ग्रुप अॅक्टिव्ह
फेसबुकने नुकतेच Candidate Connect आणि Share You Vote अशी दोन नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत. त्यात Candidate Connect या टूलवर तुमच्या भागातील लोकसभा उमेदवाराची सगळी माहिती मिळू शकते. तसेच Share You Vote या दुसऱ्या टूल्सद्वारे लोकांना मतदानाच्या दिवसांची माहिती दिली जाणार आहे.
कसा कराल वापर?
फेसबुक पेज ओपन केल्यानंतर सेटिंगमध्ये बुकमार्क ऑप्शन किंवा न्यूजफीडमधून एका मेसेजद्वारे या टूलचा अॅक्सेस दिला जाऊ शकतो. त्यात 20 सेकंदाचा एक व्हिडिओ असेल. तो ओपन केल्यावर उमेदवार त्याची माहिती, निवडणूक जिंकल्यावर त्याचा पुढचं ध्येय काय असेल, कशा समस्या सोडवेल याबाबत माहिती दिली जाईल. हे नवीन फीचर मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणलं असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. हे फीचर 12 भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुमच्या भागातील उमेदवार कोण आहे? हे घरबसल्या तुम्हाला एका क्लिकवर कळणार आहे.






















































