सावकाराच्या तगाद्याला कंटाळून कुटुंबाचा टोकाचा निर्णय; दोन मुलांसह आईवडिलांची आत्महत्या

राजस्थानमध्ये चारजणांच्या कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाने पत्नी आणि दोन मुलांसह गळफास लावून आत्महत्या केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कटुंबात आर्थिक अडचणी होत्या. तसेच कर्जाच्या परतफेडीसाठी सावकाराचा तगादा सुरू होता. त्यामुळे कुटुंबाने टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

राजस्थानच्या जयपूरमधील कानोता पोलीस ठाण्याच्या हद्दीत जामडोलीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली आहे. या कुटुंबावर कर्ज होते आणि त्यांना आर्थिक अडचणी होत्या. त्यातच व्यावसायिकाने सावकराकडून कर्ज घेतले होते. सावकार कर्जाच्या परतफेडीसाठी आणि हप्त्यांसाठी तगादा लावत होता. या त्रासाला कंटाळून कुटुंबाने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी आत्महत्येपूर्वी एखादी चिठ्ठी सापडली किंवा नाही, याबाबतची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. याबाबत अधिक तपास सुरू असून प्रथमदर्शनी ही घटना सामुहिक आत्महत्येची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुटुंबात दोन मुले आणि आईवडिल असे चारजण होते. त्या चौघांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तपासावेळी फॉरेन्सिक पथकालाही बोलावण्यात आले होते. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सावकराकडून कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सावकाराला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका कुटुंबाच्या सामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या