
बांधकाम परवान्यांसाठी संरक्षण खात्याचे बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) तयार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या कॉल डिटेल्ससह बँक खात्यांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
महसूल विभागाच्या उपविभागीय कार्यालयाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी राजेंद्रसिंग देशराजसिंग ऊर्फ राजासिंग ठाकुर व रोहित धेंडवाल यांना अटक केली आहे, तर काही संशयित एजंटांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले होते. मात्र, यापैकी एक एजंट पोलिसांच्या रडारवर असून, लवकरच त्याला अटक होऊ शकते. कारण या एजंटचा प्रांत कार्यालयाच्या परिसरात राबता होता. त्याचे कॉल डिटेल्स समोर आल्यानंतर तो कोणाच्या किती संपर्कात आणि का होता, याचे रहस्य उलगडणार आहे. तसेच बँक खात्याची चौकशी केली तर मोठा आर्थिक घोटाळा समोर येऊ शकतो.
‘एनओसी’च्या हद्दीलगत वापर करून लष्कराकडून बांधकाम परवाने मिळविण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने या परिसरात किती आराखडे मंजूर केले गेले, याची स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे. या ‘एनओसी’चा वापर करून किती बांधकामांना परवानगी दिली? ही परवनगी देताना काय निकष होते? त्याचे पालन झाले आहे का? हेही तपासले जाईल. त्यासाठी या काळात प्रांत या कार्यालयातून वितरित झालेल्या परवान्यांची माहिती बांधकाम पोलिसांनी मागविली आहे. पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे तपास आल्यानंतर त्यांनी बनावट शिक्क्यांसाठी वापरले जाणारे प्रिंटर, कागदी रील आणि शिक्के हस्तगत केले आहेत.
कोतवाली पोलिसांचे पथक पुन्हा तपासात
हे प्रकरण संरक्षण व महसूल खात्याशी संबंधित असल्याने हा तपास उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सुरुवातीपासून या प्रकरणाचा तपास झेंडीगेट पोलीस चौकीचे उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत होते. त्यांच्याकडून हा तपास काढून घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी थेट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी याबाबत तपासामध्ये पुन्हा फेरबदल करून सुरुवातीचे चौकशी करणाऱ्या झेंडीगेट पोलीस चौकीचे उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्यासह अभय कदम, सलीम शेख, सुमित गवळी, बंडू भागवत, रवींद्र टकले, अतुल काजळे, दीपक बोरुडे या पथकाला तपासात पुन्हा सहभागी करून घेतले आहे.


























































