‘फ्रान्समधील हत्याकांड योग्यच, छेड काढाल तर…’ , प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे वादग्रस्त विधान

फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांनी केलेल्या हत्याकांडाला प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी योग्य म्हटले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या कार्टूनवरून फ्रान्समध्ये आधी एका शिक्षकाचे मुंडके उडवण्यात आले होते, तर याच आठवड्यात एका चर्चजवळ महिलेची गळा कापून हत्या करण्यात आली होती.

‘जर धर्म आईसमान असेल, तर तुमच्या आईचा, धर्माचा कोणी अपमान केल्यास, वाईट कार्टून काढल्यास, शिवीगाळ केल्यास रागाच्या भरात असे कृत्य होऊ शकते’, असे विधान राणा यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्ससोबत राफेल करार केलेला असल्यामुळे ते पाठिंबा देत आहेत, असा तर्क देखील राणा यांनी मांडला.

ते पुढे म्हणाले की, मुसलमान समाजाला चिडवण्यासाठी, छेड काढण्यासाठी हे कार्टून काढण्यात आले. तसेच जगात हजारो वर्षांपासून ऑनर किलिंग सुरू आहे. अखलाक प्रकरणात काय झाले? असा सवाल उपस्थित करत त्यावेळी कोणाला त्रास झाला नाही, असेही राणा म्हणाले. तसेच कोणाला इतकेही मजबूर करू नका की तो हत्या करण्यासाठी उद्विग्न होईल, असेही ते म्हणाले. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मोदींनी केली निंदा

याआधी पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्समध्ये धर्मांध मुस्लिमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. मोदींनी ट्विट करून दाहशतवादाविरुद्ध लढाईत हिंदुस्थान नेहमी फ्रान्ससोबत उभा आहे, असे म्हटले. यावेळी त्यांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबासोबत आपल्या सहवेदना असल्याचे व फ्रान्सच्या जनतेसोबत उभे असल्याचेही म्हटले.

त्या लोकांचा चेहरा जगासमोर आला…

दरम्यान, शनिवारी गुजरातच्या केवडिया येथे एकता दिनाच्या निमित्ताने बोलताना पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनी विधान केले. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कार्टून विवादावरून काही लोक दहशतवादाचे खुल्लम खुल्ला समर्थन करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेजारील देशातून (पाकिस्तान) जे वृत्त आले, त्यात त्यांनी संसदेत सत्य (पुलवामा हल्ला) स्वीकारले. त्यामुळे या लोकांचा चेहरा जगासमोर आला, असे मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या