
प्रसिद्ध यूट्यूबर महिलेचे मॉर्फ फोटो व्हायरल करणाऱ्या दोघांना सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. नंदलाल बडेरा आणि अंकुर देब अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघेही महाविद्यालयात शिकतात. अंकुरची इन्स्टाग्रामवर 11 बनावट खाती असल्याचे तपासात समोर आले आहे.
सांताक्रूझ येथे एक प्रसिद्ध यूटय़ूबर महिला राहते. गेल्या वर्षी यूटय़ूबर महिलेला तिचे मॉर्फ फोटो व्हायरल झाल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी महिलेने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त अनिल पारस्कर यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव, पोलीस निरीक्षक ज्योती हिबारे, उपनिरीक्षक राहुल कोकाटे, भांड, चाबुकस्वार, हंचनाळे, सुरवसे, राणे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. त्यावरून पोलिसांनी बडेराला ताब्यात घेऊन अटक केली.
त्याच्या चौकशीत पोलिसांना अंकुरची माहिती मिळाली. तो आसामला असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. आसाम येथील एका ठिकाणाहून पोलिसांनी अंकुरला ताब्यात घेऊन अटक केली. अंकुर हा महाविद्यालयात शिकत असून त्याला ऑनलाइन गेमिंगचे वेड आहे. त्याची इन्स्टाग्राम आणि एका साईडवर 11 बनावट खाती असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने बनावट खात्यावरून यूटय़ूबरचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल केले. अंकुरने आणखी कोणाचे फोटो व्हायरल केले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.


























































