त्र्यंबकेश्वरमध्ये एसआयटी चौकशीचा फार्स

संदलवेळी देवाला धूप दाखविण्याच्या नावाखाली मुस्लिम तरुणांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या कथित आरोपाची शुक्रवारपासून एसआयटी चौकशी करण्याचा फार्स सुरू झाला आहे. चार विश्वस्तांसह सर्व संबंधितांचे जबाब घेतले जात आहेत.

प्रथेप्रमाणे 13 मे रोजी रात्री त्र्यंबकेश्वरमध्ये संदल काढला होता. ही मिरवणूक त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर परंपरेनुसार काही मुस्लिम तरुणांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावरून देवाला धूप दाखविण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी अडविल्यानंतर हे तरूण तेथून परत गेले. मात्र, काही मुस्लिम तरुणांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला, असा गैरसमज काही बेगडी हिंदुत्ववाद्यांनी समाज माध्यमांवरून पसरविला. उपमुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.

शुक्रवारी एसआयटीचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग पथकासह त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. बेगडी हिंदुत्वाचा डांगोरा पिटणाऱया एकासह चार विश्वस्त, पुरोहित संघ पदाधिकारी, तसेच ज्यांच्यावर आरोप करण्यात आला त्या मुस्लिम बांधवांचीही चौकशी केली. हा अहवाल शासनाला पाठविणार आहे. दरम्यान, धूप दाखविण्याची कुठलीही परंपरा नसल्याचे आम्ही चौकशीत एकमताने सांगितल्याची बोंब प्रसारमाध्यमांसमोर मारून एका बेगडी हिंदुत्ववाद्याने चौकशी पथकावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला.