
सामना प्रतिनिधी । गेवराई
शेतातून कमी उत्पन्न मिळत असल्याने आर्थिक हलाखीला कंटाळून रांजणी येथे एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. बालाजी ऊर्फ बाळासाहेब श्रीमंतराव शेंद्रे (४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
बालाजी याची गेवराई तालुक्यातील रांजणी गावात जमीन होती. पण ही जमीन अल्प असल्याने बालाजीला त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. आई,पत्नी तीनं मुलं आणि बहिण यांची त्याच्यावर जबाबदारी होती. पण पैसाच मिळत नसल्याने कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे त्याला शक्य नव्हते. तो निराश झाला होता. यामुळे आर्थिक हलाखीला कंटाळून सोमवारी त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी रांजणी स्मशान भूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी माजी न. प. उपाध्यक्ष अमोल करांडे भारतराव करांडे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.






























































