
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी रविवारी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. शेतकऱयांनो, तुम्हाला कोणत्याही क्षणी दिल्लीला यावे लागणार असून सर्वांनी आपले ट्रॅक्टर तयार ठेवा, असे आवाहन राकेश टिकैत यांनी शेतकऱयांना केले. त्यामुळे येत्या काळात शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
राकेश टिकैत यांनी रविवारी शामली येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. शेतकऱयांनी शेतीची कामे सुरूच ठेवायची असून त्यासोबत आपले ट्रॅक्टरदेखील इंधन भरून तयार ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतकऱयांची मते विचारात न घेता केंद्र सरकारने हे कायदे अमलात आणले आहेत. त्यामुळे सरकारने हे कायदे मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली.
ते पुढे म्हणाले, शेतकऱयांना विचारल्याशिवाय तुम्ही हे कायदे आणले. त्यानंतर आता तुम्ही विचारता या कायद्यात काय कमी आहे. जोपर्यंत हे कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण माघार घेणार नाही. केंद्र सरकार आपले धान्य तिजोरीत बंद करू इच्छितो. देशातील भूकेवर ते व्यापार करू इच्छितात. आम्ही असे होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी केंद्र सरकारला यावेळी दिला.
देशभरात महापंचायत आयोजित करणार
हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. त्यामुळे यासंदर्भात देशभरात महापंचायत आयोजित करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर 24 मार्चपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. शेतकऱयांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



























































