नगर- पावणे चार लाखांवर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

688

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फटका सहा लाख 34 हजार शेतकऱ्यांना बसला आहे. त्यापैकी नुकसान भरपाई पोटी आत्तापर्यंत केवळ दोन लाख 47 हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अद्यापही तीन लाख 86 हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. पाण्याअभावी गेल्यावर्षी खरीप सोबतच रब्बी हंगाम वाया गेला होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे शेतातील पिके ही जोमात होती. प्रत्यक्षात मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हातातोंडाशी आलेली पिके अतिवृष्टीमुळे गेल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यानुसार सरकारनेही मदतीची घोषणा केली. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 475 कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाठवला होता. त्यापैकी अनुदानापोटी एकशे पस्तीस कोटी रुपये जिल्ह्याला मिळाले होते. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या या अनुदानाचे वाटप जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच अनुदानाची उर्वरित रक्कम मिळावी, म्हणून प्रस्ताव देखील शासनाला पाठवला आहे. हा प्रस्ताव पाठवून आठ दिवसांचा कालावधी होऊन गेला असला तरी अद्याप अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पावणेचार लाख व शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

पहिल्या टप्प्यात मिळालेल्या अनुदानातून नगर तालुक्यातील 17 हजार 645 , अकोल्यातील 23 हजार 434 , जामखेड मधील 4 हजार 841, कर्जत तालुक्यातील 13 हजार 393, कोपरगाव तालुक्यातील 13 हजार 683, नेवासा 23 हजार 724, पारनेर 23 हजार 622, पाथर्डी 33 हजार 682, राहुरी 14 हजार 291, संगमनेर 24 हजार 498, शेवगाव 19 हजार 288, श्रीगोंदा 15 हजार 164, श्रीरामपुर 11हजार 304, व राहता तालुक्यातील 9 हजार 306 शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या