मुलीच्या लग्नाच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । हट्टा

मुलीचे लग्न महिन्यावर आलेले असतांना दुष्काळी परिस्थितीमुळे जवळ पैसे नसल्याने ४० वर्षीय शेतकरी वधू पित्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना वसमत तालुक्यातील हट्टा येथे घडली.

हट्टा गावातील शेतकरी नानासाहेब रंगनाथराव भंवर (४०) यांच्या मुलीचे लग्न जमून दोन वर्ष झाले आहेत. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात नापिकी झाल्याने मागिल दोन वर्षापासुन लग्न थांबले होते. मुलीच्या लग्नासाठी पैसे कोठुन आणायचे अशी चिंता नानासाहेब भंवर यांना सतावत होती. नानासाहेब भंवर यांनी मुलीच्या लग्नासाठी बँकेकडे बँकेकडे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, बँकेकडून त्यांना कर्ज देण्यात आले नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळत नसल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह व मुलीचे लग्न कसे करायचे या चिंतेत नानासाहेब भंवर यांनी हतबल होऊन २८ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास विष प्राशन करुन आत्महत्या केली. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ७ मे रोजी मयत नानासाहेब भंवर यांच्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त काढला असुन या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.