
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे. सरकारने आमच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला आहे. सरकारने दडपशाहीचा वापर करत कश्मीरमधील अनेक नेत्यांना अटक केली आहे. सरकारने असंवैधानिक पद्धतीने कलम 370 रद्द केले आहे. सरकार या संवेदनशील प्रश्नावर राजकारण करत असून बळाचा वापर करत आहे. संसदेत कलम 370 वर चर्चा सुरू असताना तुम्ही अनुपस्थित का होता असा सवाल केल्यावर आपण नजरकैदेत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत खोटी माहिती दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
आम्ही ग्रेनेड फेकणारे नाही किंवा दगडफेक करणारे नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने लढाई लढत आहेत. सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. सध्या माझे कुटुंब संकटांचा सामना करत आहे. माझा मुलगा ओमर याला धोका असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले. कश्मीरी जनतेचे हक्क आणि अधिकारांचा प्रश्न आहे. सरकार लोकसभेतील बहुमताचा वापर करून मनमानीपद्धतीने कायदे करत आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असेवैधनिक असून या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही अब्दुल्ला यांनी सांगितले आहे. आपण नजरकैदेत असल्याचा दावा फारूख अब्दुल्ला यांनी केला असला तरी संसदेत निवदेन देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फारुख अब्दुल्ला यांना अटक करण्यात आलेली नाही किंवा ताब्यातही घेण्यात आलेले नाही. तसेच त्यांना नजरकैदेतही ठेवले नसल्याचे स्पष्ट केले आहे.


























































