माझे सौंदर्य माझ्या आत्मविश्वासात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लीना भागवत

आवडती फॅशन …जे कम्फर्टेबल कपडे असतात ती माझी आवडती फॅशन.

फॅशन म्हणजे… जे मी जास्त चांगल्या पद्धतीने करू शकते ती माझ्यासाठी फॅशन.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…मला लेगिंग्ज आणि कुर्ता घालायला आवडतं. ते जास्त सोयीचे वाटते.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?… नक्कीच नाही. आंतरिक तुम्ही चांगले असायला हवे कारण तुम्ही कपडे कितीही फॅशनेबल घालता यापेक्षा तुम्ही आतून किती पुढारलेले आहात हे महत्त्वाचे असते. साडी नेसलेली बाई देखिल मताने इतकी फॅशनेबल असते. पण फॅशनेबल असणारी माणसे विचारांनी भुरसटलेली असली तर त्या फॅशनचा काही उपयोग होत नाही.

आवडती हेअरस्टाईल?…मानेवर बांधलेला सैल अंबाडा.

फॅशन जुनी की नवी?... जुनी, नवीन असे काही नसते. फॅशन ही नवीन आल्यावर प्रचलितच असते. फॅशन रिपीट होत असते.

आवडता रंग?…काळा.

स्ट्रीट शॉपिंग करायला आवडते का?... मला प्रचंड आवडते. मला स्ट्रीट शॉपिंग करायला आवडते. कुठलेही कपडे घेताना ठरवून घेत नाही, आवडले की घेते. पण ब्रॅण्डेड कपडे वापरणेही गरजेचे आहे हे कळायला लागलंय.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?...नेलपेण्ट्स. मी सतत काहीतरी नेलआर्ट्स करत असते. त्याच्यावर मी खूप खर्च करते. नखांना वेगळे शेप द्यायला, डिझाईन करायला आवडतं.

ज्वेलरी काय आवडते?…डायमण्ड ज्वेलरी.

आवडता ब्रॅण्ड...द ग्लोबल देसी, कॉटन कॉटेज

फॅशन फॉलो कशी करता?…मी फॅशन फॉलो करत नाही. मला समोरच्या माणसाने घातलेले कपडे आवडतात. त्याला ते छान दिसत असतात. पण मी मला जे कम्फर्टेबल वाटते तेच करते. मी करेन ती माझ्यासाठी फॅशन असते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…अपडेट राहण्यासाठी मी निरीक्षण करते आणि त्यातून मला जे चांगलं वाटतं, पटतं असेच कपडे निवडते. शिवाय कपडय़ांची निवड करताना मंगेश मला जास्त मदत करतात. मंगेश दिग्दर्शक असल्याने त्यांना रंगसंगतीचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे बऱयाचदा त्यांची मदत घेते.

ब्युटी सिक्रेट…माझा आत्मविश्वास हेच माझे ब्युटी सिक्रेट. काय घातल्यावर कशी दिसते यापेक्षा मी तोंड उघडल्यावर माझ्या तोंडून काय निघणार आहे हे आत्मविश्वासाने व्यक्त करते त्याच्यावरुन तुमचे सौंदर्य कळते.

टॅटू काढायला आवडेल का?…खूप आवडेल. पण माझ्या भूमिका अशा असतात की कायमस्वरुपी टॅटू अंगावर गोंदणे शक्य होत नाही. टॅटू कायमस्वरुपी गोंदवण्यापेक्षा तात्पुरत्या टॅटू काढायला आवडेल. पूर्वी गोंदण असायचे ते वेदनादायक आहे. त्याला जुना बाज होता. माझा कल मेंदीकडे असतो.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…आयग्लासेस होल्डर, लिपस्टिक, ब्युटी शॉपचे हॅण्डक्रीम.

फिटनेससाठी... सायंकाळी साडेसातनंतर काही खात नाही. अगदीच भूक लागली तर ग्लासभर दूध पिते. पण शंभर टक्के शाकाहारी आहे. प्रयोग असतात तेव्हा सोबत डबा घेते. प्रयोगाच्या आधी किंवा मध्यंतरात खाऊन घेते. पण साडेसात नंतर काही खात नाही.