
फिफा वर्ल्ड कपचा बिगुल आता यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने होणार आहे. मेक्सिकोचा संघ हा गटात फेव्हरीट समजला जातो. प्रशिक्षक जेवियर ऑगिरे यांच्या नेतृत्वाखाली मेक्सिकोच्या संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. मेक्सिकोचा संघाचा बचाव जेवढा उत्तम आहे, तेवढेच त्यांचे आक्रमणही. कर्णधार एडसन अल्वारेझने संघाची चांगली बांधणी केली आहे आणि त्यामुळेच त्यांचा संघ गटात सरस ठरु शकतो.
दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कपचे आयोजन 2010 मध्ये केले होते, त्यामुळे त्यांना थेट वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली होती. पण त्यानंतर त्यांना आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कपसाठी पात्र ठरता आले नव्हते. पण या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी दिमाखात एंट्री केली आहे. प्रशिक्षक हुगो ब्रुस यांनी स्थानिक स्तरापासून खेळाडूंना हेरले आणि हा संघ घडवला आहे. गोलरक्षक रोनवन विल्यिअम्सने ऐतिहासिक कामगिरी करत संघाला तारले आणि संघाला वर्ल्ड कपपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये रोनवनची कामगिरी संघासाठी महत्त्वाची ठरेल.
दक्षिण कोरिया चेकियाबरोबर दोन हात करणार
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सलग 11 व्यांदा दक्षिण कोरियाने प्रवेश करत सर्वांना आपली दखल घ्यायला लावली आहे. कोरियाचा पहिला सामना चेकियाबरोबर होणार असून यामध्ये त्यांचे पारडे जड समजले जात आहे. प्रशिक्षक हाँग म्युन बो यांनी संघाची सर्वात चांगली बांधणी केली आहे. संघातील बचाव आणि आक्रमण यांच्यात त्यांनी उत्तम समन्वय राखला आहे. बचावरक्षक किम मिनवर सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. त्याचबरोबर मिड फिल्डर ली पँग-इन याची कामगिरीही निर्णायक ठरू शकते.
गेल्या 20 वर्षांत चेकियाचा संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. पण चेकियाच्या संघात मोठया संघांना धक्का देण्याची कुवत आहे. कर्णधार थॉमस सोऊसेक हा मिडफिल्डरची जबाबदारी चोख बजावत असून आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही गोष्टी त्याच्या उत्तम आहेत. चेकियाच्या संघात सर्वाच्या नजरा या 18 वर्षांच्या हुगो सोचुरेकवरही असतील. कारण फार कमी वयात चपळाईने खेळ करत त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.






























































