तब्बल 15 परदेशी विद्यापीठांना हिंदुस्थानात कॅम्पस उघडण्यास मंजुरी, ऑगस्टपासून पहिली बॅच सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशी विद्यापीठाची पदवी घेण्यासाठी आता परदेशात जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने आतापर्यंत 15 परदेशी विद्यापीठांना हिंदुस्थानात कॅम्पस उघडण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट (एलआयओ) जारी केले आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू आदी शहरांमध्ये कॅप्सस सुरू होतील. यापैकी बहुतेक कॅम्पस ऑगस्टपासून पहिली बॅच सुरू करतील.

मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एबरडीन, ब्रिस्टल, यॉर्क, इलिनोइस टेक, लिव्हरपूल आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीसारख्या संस्था त्यांचे कॅम्पस उघडत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक कॅम्पसमध्ये 200 ते 250 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पुढील पाच वर्षांत हे प्रमाण वाढवून प्रत्येक कॅम्पसमध्ये वार्षिक 1,000 ते 1,200 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

परदेशी विद्यापीठांच्या हिंदुस्थानातील कॅम्पसमध्ये शिक्षण, परीक्षा, मूल्यांकन आणि पदवी पूर्णपणे त्यांच्या मूळ कॅम्पसच्या जागतिक मानकांनुसार असेल. पहिल्या टप्प्यात एआय, कॉम्प्युटर सायन्स आणि एसटीईएम विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

युनिव्हर्सिटी ऑफ एबरडीन (मुंबई), ब्रिस्टल (मुंबई), लिव्हरपूल (बंगळुरू), यॉर्क (मुंबई), इलिनोइस टेक (मुंबई) आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी (दिल्ली) कॅम्पस उघडत आहेत. सध्याच्या सत्रासाठी 10 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

परदेशात जाऊन 80 लाख ते 1.2 कोटी रुपये खर्च करण्याऐवजी भारतात 30-40 टक्के कमी खर्च येईल. पात्रता आणि गरजेनुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.