राज्य कबड्डी संघटनेच्या कार्याध्यक्ष, कोषाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना क्रिडा प्रतिनिधी । पुणे

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत बहुतांशी पदांसाठी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, मात्र कार्याध्यक्ष आणि कोषाध्यक्षपदाची कोंडी फुटू शकली नाही. त्यामुळे आज 25 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत या दोन पदांसाठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे. मुंबई उपनगरचे गजानन कीर्तिकर व संभाजीनगरचे दत्ता पाथ्रीकर यांच्यामध्ये कार्याध्यक्षपदासाठी, तर कोल्हापूरचे रमेश भेंडगिरी व परभणीचे मंगल पांडे यांच्यामध्ये कोषाध्यक्षपदासाठी चुरस रंगेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून या घडीला तरी कार्याध्यक्षपदासाठी गजानन कीर्तिकर, तर कोषाध्यक्षपदासाठी मंगल पांडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

या पदांसाठी बिनविरोध निवड
अध्यक्ष : अजित पवार (पुणे). उपाध्यक्ष : देवराम भोईर (ठाणे), अमरसिंग पंडीत (बीड), शशिकांत गाडे (नगर), दिनकर पाटील (सांगली). उपाध्यक्ष (महिला राखीव) : शकंतुला खटावकर, नेत्रा शिर्के. सरकार्यवाह : आस्वाद पाटील (रायगड). सहकार्यवाह : मदन गायकवाड (सोलापूर), मोहन गायकवाड (नाशिक), रवींद्र देसाई (रत्नागिरी), महादेव साठे (धाराशीव). सहकार्यवाह (महिला राखीव) : सय्यदा पटेल (नांदेड), स्मिता जाधव

निवडणूक थांबवा; माजी खेळाडूंची असोसिएशनला नोटीस
आज होणारी राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक ताबडतोब थांबवावी आणि क्रीडा आचारसंहितेनुसार सर्व पदाधिकाऱ्यांची येत्या दहा दिवसांत माहिती द्यावी, अशा स्वरूपाची नोटीस काही माजी खेळाडूंनी राज्य कबड्डी असोसिएशनला पाठवली आहे; अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात दाद मागण्यात येईल, असेही म्हटले आहे. ही नोटीस हौशी कबड्डी महासंघावर असलेल्या प्रशासकांनाही पाठविण्यात आली आहे.