
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत सुरू असलेले आगीचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आज सायंकाळी वरळी जांबोरी नाका येथील साधना टेक्सटाईल मिल कंपाऊंडमधील तळमजल्यावरील रिलायन्स केबल सेंटरमध्ये आगीचा भडक उडाला. आत असलेल्या केबल आणि केमिकलने काही कळायच्या आत पेट घेतल्याने परिसरात विषारी धुराचे लोट उसळले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग विझवताना अग्निशमन दलाच्या बारा जवानांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
साधना टेक्सटाईल मिल कंपाऊंडमध्ये चार मजली व्यावसायिक इमारत आहे. यामध्ये रिलायन्स, महिंद्रा कंपनीबरोबरच इतर कंपन्यांची कार्यालये आहेत. तळमजलवर असलेल्या रिलायन्सच्या कार्यालयात सायंकाळी पाचच्या सुमारास आगीचा भडका उडला. त्यामध्ये केबल आणि बाजूलाच असलेल्या केमिकलने पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट उसळले. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन 15 फायर इंजिनच्या मदतीने काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु आतून मोठय़ा प्रमाणात उसळणाऱया धुरामुळे श्वासनाचा त्रास झाल्याने अग्निशमन दलाचे बारा जवान जखमी झाले असून त्यांना पोदार आणि केईएम रुग्णालयात दाखल केल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. रात्री उशिरापर्यंत कूलिंगचे काम सुरू होते.
जखमी जवान – विजय मालुसरे, रमेश महाले, रमेश बाबर, बालाजी ढगे, राजू लिणार, सुबोध पेडणेकर, विशाल विश्वासराव, स्वाती सातपूते, स्वप्नाली चिकने, गौतम महाले, संजय चव्हाण, वंकटेश देवकते.
निवासी परिसरात केबल, केमिकलची कामे करणाऱयांवर कारवाई करावी
आगीचा भडका रिलायन्स केबल सेंटरमध्ये उडाला. या ठिकाणी केबल बनवण्याचे काम चालत होते का हे नक्की माहीत नाही पण धुराच्या उग्र वासामुळे केबल आणि केमिकलचा मोठा साठा असण्याची शक्यता असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे मोठय़ा संख्येने निवासी परिसर असलेल्या ठिकाणी अशी केमिकल आणि केबल ठेवणे घातक आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक व बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक दत्ता नरवणकर हेही उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसाठी जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली.
इमारतींचे फायर ऑडिट व्हावे – सुनील शिंदे
आगीची माहिती मिळताच आमदार सुनील शिंदे यांनी धाव घेऊन पाहणी केली. मुंबईत दिवसेंदिवस आगीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी मिलच्या जागेवर व्यावसायिक इमारती उभ्या असून त्यामध्ये वेअर हाऊस, कार्यालये आहेत. त्यामुळे आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच इमारतींचे फायर ऑडिट करून असलेल्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी सुनील शिंदे यांनी केली.
भिंत तोडून आग विझवण्याचा प्रयत्न
आग लागलेल्या ठिकाणी जाता येत नसल्याने धुराचे लोट वाढत होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंत तोडून आग विझवण्याची मोहीम हाती घेतली. भिंत तोडताना अचानक आतील धुराचे लोट उसळल्यानेच जवानांना श्वसनाचा त्रास झाला. तसेच आतमधून खिडक्यांसमोर लोखंडी कपाटे उभी केलेली असल्याने जवानांना आग विझवताना मोठी कसरत करावी लागत होती.
कमला मिलमध्ये पुन्हा आग
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड समोरील बांधकाम सुरू असलेल्या ऑर्बिट टेरेस या इमारतीला अचानक आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या चार गाडय़ांमधील जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. इमारतीच्या अकराव्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याने तेथील लाकडी सामानाने पेट घेतला. त्यावेळी काही कामगार इमारतीत काम करीत होते. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. ही दुर्घटना सकाळी साडेसात वाजता घडली. एक तासाच्या आतच अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत आग लागल्याच्या घटना वाढत आहेत. 27 डिसेंबरला चेंबूर, टिळक नगर येथील सरगम सोसायटीमध्येही भीषण आग लागली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच कमला मिल कंपाऊंडमधील दोन पबमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे 60 जण जखमी झाले होते.
सहा वर्षांत 29 हजार 140 आगीच्या घटना
मागील सहा वर्षांत मुंबईत तब्बल 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्या आहेत. माहिती अधिकार कायद्याखाली मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या सुमारे 300 च्या वर आहे.




























































