नव्या इमारतींमध्ये फायर, स्मोक अलार्म बंधनकारक! फायरमॅन इव्हॅक्युएशन लिफ्टही बसवावी लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताडदेव येथे उत्तुंग कमला इमारतीच्या 19व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत सहाजणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील बहुमजली इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे उत्तुंग इमारतींच्या सुरक्षेसाठी आता प्रत्येक मजल्यावर अग्निशमन यंत्रणेसह फायर आणि स्मोक अलार्म लावणे बंधनकारक करण्यात येत आहे. यामध्ये माणसालाही न समजणाऱ्या आगीचा-धुराचा धोका ओळखून अलार्म वाजणार आहे. त्यामुळे आग भडकण्याआधीच रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाता येणार असून अग्निशमन दलाला बचावकार्य करणे सुलभ होणार आहे. शिवाय अशा दुर्घटनांमध्ये बचावकार्यासाठी ‘स्पेशल फायरमॅन इव्हॅक्युएशन लिफ्ट’ही बसवावी लागणार आहे. याबाबत पालिकेचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी दैनिक ‘सामना’शी संवाद साधला आहे.

उत्तुंग इमारतींच्या अग्निसुरक्षेसाठी आपल्याकडे कोणती साधने आहेत?

पालिकेच्या अग्निशमन दलात सध्या 30 व्या माळ्यापर्यंत पोहोचू शकणारी 90 मीटरची शिडी आहे. या शिडीच्या सहाय्याने अनेक दुर्घटनांत आतापर्यंत शेकडो जणांचे जीव वाचवण्यात यश आले आहे, मात्र यापेक्षा जास्त उंचीच्या शिडीवर तोल सांभाळण्याच्या दृष्टीने मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे 45 मीटरवरील इमारतींमध्ये स्प्रिंकलर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवून दर सहा महिन्यांनी अग्निशमन दलाला तसा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दुर्घटना रोखण्यासाठी कोणते नवे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते?

खरे तर उत्तुंग इमारतींच्या अग्निसुरक्षेसाठी रहिवासी आणि इमारत मालकांनी आपली जबाबदारी ओळखून अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवली पाहिजे. माणसाला न जाणवणारा आगीचा धोका, धूर ओळखून अलर्ट देणारी अलार्म यंत्रणा बसवली पाहिजे. शिवाय ‘स्पेशल फायरमॅन इव्हॅक्युएशन लिफ्ट’ही बसवावी लागणार आहे, जेणेकरून जवान रहिवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढू शकतील. नव्या इमारतींसाठी पालिकेकडून हे बंधनकारक करण्यात येत आहे, तर जुन्या इमारतींनी यासाठी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. सध्या रुग्णालयांत अशी यंत्रणा बसवण्यात येत आहे. मुंबईत 80 टक्के आगी शॉर्टसर्किटमुळे लागतात. त्यामुळे मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्यास ती विझविण्याचे काम करणारी यंत्रणाही बसवण्यात येत आहे. बचावकार्य करताना रोबोट आणि जवानांच्या सुरक्षेसाठी धुरातही जाऊन आगीवर नियंत्रण मिळवता येईल असा विशिष्ट प्रकारचा सूट वापरण्यात येत आहे.

पालिकेच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कोणती कारवाई होते?

अग्निशमन दलाकडून सोसायट्या, आस्थापने, रुग्णालये, नर्सिंग होम, कार्यालयांचे वेळोवेळी इन्स्पेक्शन करण्यात येते. या वेळी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आल्यास नोटिस देऊन 120 दिवसांत यंत्रणा उभारून अहवाल देणे बंधनकारक करण्यात येते. याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाईनंतर वीज-पाणी कापण्याचीही कारवाई होते. सध्या 1574 हॉस्पिटल-नर्सिंग होमचे सर्वेक्षण केले असून 25 रुग्णालये-नर्सिंग होमविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे, तर 223 सोसायट्यांच्या तपासणीत 133 जणांना नोटीस बजावण्यात आली असून 67 जणांनी कार्यवाहीसाठी मुदत वाढवून मागितली आहे.

अग्निसुरक्षेसाठी इतर कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे?

इमारतीमध्ये 24 मीटरच्या वर प्रत्येक सातव्या मजल्यावर 4 टक्के रिफ्यूज एरिया ठेवणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे अनिवार्य आहे. शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगींचा धोका सांगणारे सेल्फ इलेक्ट्रिक ऑडिट डिव्हाईस बसवले पाहिजे. यामध्ये वीस प्रकारचे इलेक्ट्रिक फॉल्ट समजणार आहेत. शिवाय सोसायट्या, कार्यालये, ऑफिसमध्ये होणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला पाहिजे. आग लागणारच नाही याची खबरदारी घेणे, प्राथमिक बचावकार्य सुरू करणे याची माहिती मॉक ड्रिलमध्ये दिली जाते. यामध्ये उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन सहभाग घेत मुंबईकरांनी ‘अग्निसाक्षर’ बनायला हवे!