
मुसळधार पावसाने दक्षिण गोव्यातील गुडी-पारोडा ते काराळीपर्यंत मडगाव ते केपे हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. यामुळे पारोडा येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका मृत व्यक्तीच्या घराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. या संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी अग्निशामक दल धावून आले.
काल रात्री पारोडा येथील ज्येष्ठ नागरिक गजानन पडियार यांचे निधन झाले. त्यांचे घर पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. त्यामुळे कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी मृतदेह पुरातून स्मशानभूमीपर्यंत कसा न्यायचा, असा प्रश्न पडला होता. पडियार यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी मडगाव स्मशानभूमीत नेण्यासाठी अखेर समाजकल्याण मंत्री
सुभाष फळदेसाई यांच्या सहकार्याने कुडचडे अग्निशामक दलाची मदत घ्यावी लागली.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पारोडा येथील रस्ते जलमय झाले. यामुळे गजानन पडियार यांचा मृतदेह अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी मडगाव येथे नेताना अडचणी येत होत्या. यामुळे पडियार कुटुंबियांनी सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची मागणी केली. तेव्हा फळदेसाई यांनी त्वरित अग्निशामक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुडचडे अग्निशामक दलाला मदतीसाठी पाठवले. कुडचडे अग्निशामक दलाचे दामोदर जांबावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास बोटीच्या मदतीने मृतदेह पारोडा येथून काराळी येथे आणण्यात आला व शववाहिकेत घालून मडगाव स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
























































