
राज्यातील पहिली महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत वाईतील सचिन चव्हाण यांच्या रायफल आणि अर्जुन या बैलजोडीने जिंकली आहे. आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यभरातून सुमारे 300 बैलगाडय़ा सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. शर्यतीच्या एकूण 37 फेऱया घेण्यात आल्या. प्रत्येक फेरीच्या वेळी उपस्थित प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देत होते. अंतिम स्पर्धा अतिशय थरारक व काळजाचा ठोका चुकवणारी अटीतटीची आणि प्रेक्षकांची डोळ्यांचे पारणे फेडणारी झाली. यामध्ये प्रथम क्रमांकाची दोन लाख 22 हजार रुपयांचे बक्षीस वाईतील सचिन चव्हाणांच्या बैलजोडीला मिळाले, तर दुसरा क्रमांक माळशिरस येथील तांबोळी यांच्या राणा ग्रुपने पटकावला. तृतीय क्रमांक किशोर भिलारे यांना मिळाला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार झिशान सिद्दिकी यांच्यासह 11 आमदार उपस्थित होते.




























































