हिंदुस्थानला धक्का ; उपांत्य फेरीसाठी आज लंकेला हरवावेच लागेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखळीतील तिन्ही सामने जिंकणाऱ्या हिंदुस्थानी युवतींच्या संघाला 19 वर्षांखालील मुलींच्या वर्ल्ड कपच्या सुपर सिक्स गटातील पहिल्याच लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियन माऱ्यापुढे 87 धावांतच आटोपला आणि प्रतिस्पर्ध्यानी विजय लक्ष्य 37 चेंडू आणि 7 विकेट राखून सहजगत्या गाठले. आता हिंदुस्थानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उद्या रविवारी श्रीलंकविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मोठा विजय नोंदवावा लागणार आहे. सुपर सिक्समधील अव्वल चार संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळणार आहे.

आजपासून सुरू झालेल्या वर्ल्ड कपच्या सुपर सिक्समध्ये तीन-तीन संघाचे चार गट करण्यात आले असून प्रत्येक संघ पुन्हा 2-2 सामने खेळणार आहे. त्यानूसार हिंदुस्थानची आज ऑस्ट्रेलियाशी गाठ पडली. त्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी स्पर्धेत फुल फॉर्मात असलेल्या हिंदुस्थानी फलंदाजांची तारांबळ उडवली. मिली इलिंगवर्थने चार चेंडूंत शेफाली शर्मा (8) आणि गोंगडी त्रिशाला बाद करून हिंदुस्थानी संघाला जबर हादरा दिला. या धक्क्यातून हिंदुस्थानी संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. मिलीनंतर क्लार्कने दोन हादरे दिले. पुढे सलग तीन षटकांत सिआना जिंजरने तीन धक्के देत हिंदुस्थानी फलंदाजीचे कंबरडेच मोडून टाकले. यातून ंिहंदुस्थानी संघ पुरता कोसळला आणि 87 धावांतच हिंदुस्थानचा डाव संपला. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजांच्या कामगिरीचा लाभ उठवत विजयी लक्ष्य 13.5 चेंडूंतच गाठले. 3 बाद 37 या स्थितीतून संघाला बाहेर काढताना क्लेअर मूर (25) आणि ऍमी स्मिथने (26) चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागी रचत संघाचा विजय अधिक सोप्पा केला. आज झालेल्या अन्य सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचा 121 धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरी प्रवेशाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. तसेच दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर मात केली. तसेच न्यूझीलंडने रवांडाला सहज नमवले.