हरयाणात सापडले हडप्पाकालीन प्रेमी युगलाचे सापळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। हरयाणा

हरयाणातील राखीगढी भागात उत्खननात हडप्पाकालीन प्रेमी युगलाचे सापळे सापडले आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात या प्रेमी युगलाचे थडगे सापडले आहे. आजपर्यंत पुरातत्व विभागाला हडप्पाकालीन संस्कृतीशी संबंधित अनेक थडगी सापडली आहेत. पण प्रेमी युगलाचे थडगे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या प्रेमी युगलाचे तोंड, हात, पाय सारखेच आहेत. यामुळे या दोघांना ऐन तारुण्यात गाडले असावे असे संशोधकांचे म्हणणे आहे. यावर आंतराष्ट्रीय मॅगेझिन ‘एसीबी जर्नल ऑफ अॅनोटोमी अॅण्ड सेल बायोलॉजी’ मध्ये लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हे उत्खनन व थडग्याचे विश्लेषण पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेंसिक सायन्स, सोल नॅशनल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीन यांनी केले आहे. याआधी लोथल येथेही हडप्पा संस्कृतीशी मेळ खाणारे एक थडगे सापडे होते. ते थडगे एका विधवा महिलेचे होते.  पतीच्या निधनानंतर तिला जिवंत गाडण्यात आले होते. पण याआधी कधीही प्रेमी युगलाला गाडल्याचे समोर आले नव्हते. दरम्यान हे प्रेमी युगल स्त्री पुरुष होते की समलैंगिक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र युगलाचे वयोमान 21 ते 35 वर्षादरम्यान आहे. ज्याप्रकारे त्यांना गाडण्यात आले आहे त्यावरून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते व मरणानंतरही ते प्रेम तसेच राहावे याची विशेष काळजी घेतल्याचे दिसत आहे.  यातील एकाची उंची पाच फूट सहा इंच असून दुसऱ्याची उंची पाच फूट दोन इंच आहे. थडग्याजवळ काही मातीची भांडी व धातूचा हार सापडला आहे.  तसेच युगलाचा मृत्यू एकाचवेळी झाल्याचे समोर आल्याने त्यांना मृत्यूनंतर गाडण्यात आले असावे किंवा दोघांना एकाचवेळी जिवंत गाडले असावे असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.