फ्लॅमिंकोचा विलक्षण अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द्वारकानाथ संझगिरी < [email protected]>

प्रत्येक देशाची, संगीताची, नाचाची एक संस्कृती असते. त्याला ‘फोक’ असा एक सर्वसमावेशक शब्द वापरला जातो. तसा हा स्पॅनीश फोक म्हणूया. हे खूपच स्वैर वर्णन झालं. अगदी फ्लॅमिंकोची नक्कल डोळय़ासमारे आणायची असेल तर ‘इंग्लिश विंग्लीश’ या चित्रपटातलं ‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’ हे गाणं किंवा ‘जिंदगी नहीं मिलेगी दोबारा’मधलं ‘सेनोरिटा’ हे गाणं आठवा… आणि आठवत नसेल तर पहा. फ्लॅमिंकोची टिपीकल बॉलीवूड झलक पाहायला मिळेल. या गाण्यातले नाच हे अस्सल फ्लॅमिंको नाहीत. फ्लॅमिंको डान्सरचे कपडे घालून हिंदुस्थानी प्रेक्षकांना रुचेल असा नाच बसवण्याचा तो प्रयत्न आहे. मूळ इटालियन पिझ्झा आणि अमेरिकन पिझ्झा यात फरक आहे तेवढा हा फरक आहे.

मी हा डान्स माद्रिद या स्पेनच्या राजधानीत पाहिला. पॅरिसमधल्या मुलेरौज किंवा ‘लिडो’सारखा तो भव्यदिव्य नाही. तिथे डोळे दिपतात. इथे डोळे दिपत नाहीत. पण तो टिपीकल डान्स तुम्हाला नाचत बाहेर आणतो. डोळय़ासमोर ती लाल-काळय़ा कपडय़ातली डान्सर आणि ते गाणं कानात बराच काळ वस्तीला राहातं. थिएटर तसं मोठं नव्हतं. पण शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची जुनी इमारत होती. तिथे अशा इमारतींना ‘जुनी’ विशेषण वापरत नसावेत. त्या सर्व ‘यौवना’तल्या इमारती वाटतात. दोन-अडीचशेची क्षमता असलेले थिएटर भरलेलं होतं. किंचित पिवळय़ा कांतीची चपटय़ा नाकाची, प्रेम करतानाही वाद घालतायत असं वाटावं अशा भाषेची मंडळी तिथे अधिक होती. युरोपियन थिएटरमध्ये एक गोष्ट चांगली असते वाईन, बीअर, कॉकटेल अगदी व्हिस्कीचा पेग किंवा तुमची क्षमता असेल तर अनेक पेग घेत परफॉर्मन्स पाहता येतो. परफॉर्मन्स पाहताना तुम्हाला तुमच्या प्रियतमेचं चुंबन घ्यावंसं वाटलं तर ते निषिद्ध नसतं. किंबहुना कुणीही त्याला निषिद्ध वगैरे मानत नाही. त्यासाठी थिएटरमध्ये शेवटची, कॉर्नरची सीट वगैरे बुक करायची गरज नसते.

फ्लॅमिंको हा स्पेनच्या मातीतल्या संगीतावर आधारित असा गीत-नाच प्रकार आहे. तो गेल्या दोन शतकांत जास्त लोकप्रिय झाला. पण त्यावर अरेबिक संस्कार आहेत. हिंदुस्थानी भटक्या जमातीच्या संगीताची फोडणी त्या नाच प्रकाराला दिली आहे. स्पेनवर 800 ते 1500 शतकापर्यंत मुस्लिम राजवट होती. तेव्हा अरेबिक संगीत तिथल्या मातीत मिसळलं. संगीताचं एक चांगलं असतं. ते जातपात, धर्म वगैरे मानत नाही. त्यामुळे एकमेकात कधी आणि कसं मिसळून जातं कळतच नाही. या फ्लॅमिंकोत बॅलेमधूनही चांगल्या गोष्टी घेतल्या आहेत आणि बॅलेलाही काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. संगीत, नाच, चित्रकला, खाणंपिणं यातली सांस्कृतिक देवाण घेवाण मला प्रचंड आवडते. त्यामुळे मूळ संस्कृती बाटत नाही. ती समृद्ध होते. या देवाण-घेवाणीला आक्रमक बळजबरी म्हणणं चुकीचं आहे.

या फ्लॅमिंको नाचातले तीन महत्त्वाचे भाग म्हणजे गाणं. ज्याला स्पेनमध्ये कॅन्टे (cante) असं म्हणतात. दुसरा नाच (Baile) आणि तिसरी गिटार, पण त्याचबरोबर हाताच्या टाळय़ांनी आणि पाय जमिनीवर आपटत साथ देणे हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नाचणारी स्त्री किंवा पुरुष स्टेजवर तुमच्यासमोर असल्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष जातं. पण मागची गायक-गायिकाही महत्त्वाचे असतात. गिटार हे या नाचाचं महत्त्वाचं अंग. ही गिटार नेहमीच्या क्लासिकल गिटारपेक्षा वेगळी असते. स्पॅनिश सायप्रेस किंवा रोझवूडची बनवलेली असते. वरची बाजू हलकी असते. त्यामुळे त्याचा आवाज जास्त मोठा असतो. त्याचं कारण असं की, या नाचात टाळय़ांचा उपयोग ठेक्यासाठी होतो, तसा बुटांचासुद्धा. फ्लॅमिंको नर्तकांचे बूट थोडे वेगळे असतात. नर्तकीच्या बुटाच्या टाचा वेगळय़ा असतात. त्याला आता फ्लॅमिंको हिल्सच म्हणतात. पुरुषाच्या बुटाची टाच थोडी कमी असते, पण त्याला पण टाच आणि चौडय़ावर बारीक खिळे असतात. नाचताना त्यातून आवाजाची निर्मिती होते. या सर्व आवाजांतून गिटारचा आवाज नीट ऐकू यावा याकरिता गिटारचा आवाज मोठा असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गिटार बोटाने वाजवली जाते. जिथे गिटारच्या तारांचा पुल (Bridge) असतो त्याच्याजवळून ती गिटार वाजवली जाते.

फ्लॅमिंको नाच हा दर्शनीय आणि सर्वांत आकर्षक भाग असतो. बऱयाचदा तो सोलो नाच असतो. पण आता सोलो डान्सरबरोबर इतरही नाचतात. थोडक्यात कोरियोग्राफी केलेली असते. अलीकडे पुरुष-स्त्री नर्तकही एकत्र नाचतात. या नाचामध्ये हात आणि बाहुच्या हालचाली वेगात आणि वैशिष्टय़पूर्ण असतात. या नर्तनाच्या चेहऱयावरचे हावभाव आणि त्यातून जाणवणाऱया भावना फार महत्त्वाच्या असतात. या नाचाकडे, नर्तनाच्या हातापायाच्या हालचालीकडे किंवा मुद्राभिनयाकडे पाहिले तर हिंदुस्थानातील दाक्षिणात्य शास्त्रीय नृत्यकलेची त्यावर छाप पडलेली दिसते.

त्यांचा पोषाख खास असतो. बऱयाचदा लाल किंवा काळय़ा रंगाचा. पुरुषांच्या बाबतीत घट्ट पॅण्ट, शर्ट, जॅकेट आणि वर स्ट्रॉ हॅट हा पोषाख असतो. महिलांच्या बाबतीत कमरेला घट्ट बसणाऱया लाल-काळय़ा स्कर्टला फ्रिल्स असतात. त्या नाचताना विलक्षण सुंदर दिसतात. त्या नर्तकी त्या फ्रिल्स धोतराच्या सोग्याप्रमाणे हातात धरून नाचतात तेव्हा ते दृश्य डोळय़ांचं पारणं फेडते. फ्लॅमिंको डान्स हा तुम्ही जर नृत्य, संगीत, गानप्रेमी असाल तर विलक्षण अनुभव आहे. स्पेनला गेलात तर पहाच पहा.