
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील तरुणांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आले पण प्रत्यक्षात काम मात्र जवानांवर दगडफेक करण्याचे देण्यात आले होते, अशी महिती या तरुणांनी पोलिसांना दिली आहे.
हे तरुण उत्तर प्रदेशमधील सहारणपूर आणि बागपतचे रहिवासी आहेत. ते नोकरीच्या शोधात होते. त्याचदरम्यान त्यांची ओळख एका व्यक्तीबरोबर झाली. त्याने या दोघांना कश्मीरमध्ये टेलरची नोकरी देण्याचे व दरमहिना २० हजार रुपये पगार देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर या दोघांना पुलवामात नेण्यात आले. तेथे त्यांच्याकडून काहीदिवस टेलरचे काम करून घेण्यात आले. नंतर त्यांना दगडफेकीचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे तरुणांना संशय आला व त्यांनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबद्दल मालकाकडे परवानगी मागितली. पण इथून गेल्यास तुम्हाला चोरीच्या खोटया आरोपाखाली अडकवू अशी धमकी त्यांना देण्यात आली, असे या तरुणांनी पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच त्याचा अहवाल आल्यानंतर जम्मू-कश्मीर पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे



























































