हनीट्रप लावून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीनंतर हनीट्रप लावत विनयभंग झाल्याचा कांगावा करून साथीदारांसह येथील एकाला पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. अवघ्या 12 तासांत या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले आहे.

रामकुमार आईदानराम विष्णोई (वय 23), दिनेश मोहनलाल विष्णोई (वय 20, रा. हरीपुरा, ता. फलोदी, जि. जोधपूर), लक्ष्मीलाल सरदारजी मीना (रा. मोहंदम फलासिया, ता. झाडोल, जि. उदयपूर) व निशू रामनिवास मीना (वय 21, रा. बमौरी, जि. गुना, मध्य प्रदेश, सध्या सर्व रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सातारा येथील एकाची इन्स्टाग्रामवर पुण्यातील एका मुलीशी मैत्री झाली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. त्यातून 2 जुलै रोजी संबंधित युवतीने त्याला येथील रेल्वे स्थानकावर भेटायला बोलावले. तेथे गेल्यावर तिने त्याला एका कारमध्ये बसायला सांगितले. त्यावेळी तीनजण आधीच गाडीत होते. गाडीत बसल्यावर युवतीचा विनयभंग केल्याचा कांगावा त्यांनी केला. तसेच, प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याचवेळी त्यांनी त्याच्या मोबाईलवरून 64 हजार रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले.

या प्रकाराबाबत संबंधिताने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने तपास सुरू केला. तपासामध्ये संबंधित संशयित हे रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुह्यात वापरलेला चाकू, पिस्टलसारखा दिसणारा सिगारेट लायटर, फिर्यादीचा जबरदस्तीने घेतलेला मोबाईल व रोख रक्कम असा 2 लाख 54 हजार 900 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, विक्रम पिसाळ, स्वप्नील माने, स्वप्नील दौंड, शिवाजी भिसे, सचिन ससाणे, रोहित निकम हे या कारवाईत सहभागी होते.