आगीत ज्वारीचे शेंदरे व कडबा जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जळकोट

जळकोट येथील एका शेतकऱ्याने शेतात ठेवलेले 100 क्विंटल ज्वारीचे शेंदरे व ज्वारीचा 2 हजार कडबा असा एकूण २ लाख रुपयांचा माल अज्ञातांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाला. याची एकूण किंमत २ लाख रुपये एवढी होती. श्रावण भुजंगराव गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही आग शेजारील चार शेतकऱ्यांनी लावली असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.

गायकवाड यांनी जळकोट येथील शेत गट नंबर 1114 व 1113 या शेतीमध्ये लागवड केलेली 5 बॅग ज्वारीची कापणी व खुडणी करुन शेतात राशीसाठी लावून ठेवली होती. ज्यात 100 क्विंटल ज्वारीचे शेंदरे व ज्वारीचा 2 हजार कडबा होता. पण 13 नोव्हेंबर रोजी रात्री काहीजणांनी त्याला आग लावली. त्यात ज्वारीचे शेंदरे व ज्वारीचा कडबा जाळून खाक झाला. दरम्यान याप्रकरणी मंडळ अधिकारी व्ही. एस. सूर्यवाड व तलाठी युवराज करेप्पा यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करून तहसील कार्यालयास सादर केला आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांविरुध्द योग्य ती कार्यवाही करावी व मला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी श्रावण गायकवाड यांनी अर्जाद्वारे केली आहे.