
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रमुख मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्य सरकारच्या फसव्या योजनांचा भंडाफोड केला.
राज्यभरात ठिकठिकाणी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आणि मनमानी कारभाराविरोधात ‘होऊ द्या चर्चा’ हा उपक्रम राबवला जात असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य आपल्या मनातील रोष आणि संताप या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. चंद्रपूर विधानसभेतही ‘होऊ द्या चर्चा’चे आयोजन केले होते. सीएसटीपीएस मेजर गेट-ताडोबा रोड-तुकूम, श्री हनुमान मंदिर-मित्र नगर-राम नगर आणि पडोली चौक, नागपूर रोड या ठिकाणी ‘होऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनीही चर्चेत भाग घेऊन सरकारच्या फसव्या योजनांवर संताप व्यक्त केला.
या वेळी जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, माजी महानगरप्रमुख प्रमोद पाटील, जिल्हा संघटिका उज्ज्वला नलगे, युवासेना जिल्हाधिकारी विक्रांत सहारे, युवती जिल्हाधिकारी रोहिणी पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक विनय धोबे, युवासेना शहर संघटिका वर्षा कोठेकर, माजी जिल्हा संघटिका कुसुम उधार, नीलिमा शिरे तसेच युवासेना, अन्य अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, भायखळा सहसंघटक सूर्यकांत पाटील, युवासेना मुंबई समन्वयक अमित जाधव यांच्यासह चंद्रपूर लोकसभेतील प्रमुख पदाधिकारी व स्थानिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

























































