पुणे पोलिसांचा मोफत बस प्रवास बंद, पीएमपीएल प्रशासनाकडून आदेश जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस कर्मचाऱ्यांना पीएमपीएल बसेसमधून देण्यात येणारा मोफत बस प्रवास आता बंद करण्यात आला आहे. याबाबत पीएमपीएल प्रशासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे आता पोलिसांना बसमधून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागणार आहे.

महापालिका परिवहन सेवेच्या म्हणजेच पीएमपीएल बसगाड्यांमधून कर्तव्यार्थ पोलीस कर्मचारी मोफत प्रवास करतात. या प्रवासखर्चापोटी राज्य सरकारच्या गृहविभागाकडून अनुदान दिले जाते. मार्च 1991पासून राज्यभरात ही सेवा सुरू करण्यात आली होती, मात्र आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार, ही सेवा बंद करण्यात आल्याने पोलिसांना तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. याच निर्णयाला अनुसरून पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे मोफत प्रवास बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन महामंडळातील सेवकांना विशेषत: कंडक्टर, तिकीट तपासणीस, पर्य़वेक्षकीय सेवकांना आदेश देण्यात आले आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसेसमधून विनातिकीट बस प्रवासाची सुविधा मंगळवार (दि.15) पासून बंद करण्यात आली आहे, असे पीएमपीएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, मोफत प्रवासाच्या बदल्यात पोलीस प्रशासनाकडून पीएमपीएलला देण्यात येणारे अनुदान वेळोवेळी मिळत नव्हते. हे अनुदान मिळविण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार करावा लागत असे. लाखो रुपये अनुदान मिळत नसल्याने पीएमपीएलला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.