
वाढती महागाई आणि इंधन-गॅसच्या कमतरतेमुळे फ्रान्समधील जनतेत प्रचंड रोष आहे. पॅरिस सारख्या शहरात गॅस स्टेशनवर तास तासभर वाट पाहिल्यानंतर गाड्यांमध्ये इंधन टाकता येत आहे.
इंधनाचा प्रचंड तुटवडा आणि महागाईमुळे फ्रान्समध्ये वाहतूक विभाग, विद्यालये आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी इमॅन्युअल मॅक्रों सरकारविरोधात आंदोलन करायला सुरुवात केली आहे. फ्रान्सने रशियावर घातलेल्या बंदीमुळे इंधन आणि गॅस तुटवडा झाला आहे. पुरवठा पूर्ववत होण्यासाठी ही बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी जनता करत आहे.
मे महिन्यात इमॅन्युअल मॅक्रों यांनी आपला राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ सुरू केला होता. त्यांच्या सरकारनेच रशियावर बंदी घातली. याचा विरोध म्हणून देशातील प्रमुख संघटनांनी सरकारला आव्हान देत संपाची घोषणा केली आहे. या संपाची सुरुवात ऊर्जा क्षेत्रातील कंपनीतर्फे चालवल्या जाणाऱ्या रिफायनरी आणि डेपोच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे, वाहन चालकांनी इंधनासाठी हाणामारी केल्याने इंधन क्षेत्रातील कर्मचारीही संपावर गेले आहेत.
रशियाकडून गॅस पुरवठा बंद झाल्यानंतर संपूर्ण यूरोपमध्ये आता महागाईने उच्चांक गाठला आहे. उर्जा संकटामुळे येऊ घातलेल्या हिवाळ्यात घरांमध्ये ऊब कशी ठेवायची, याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. रशियावर घातलेल्या बंदीमुळे संपूर्ण यूरोपची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे.




























































