MONO RAIL एप्रिलपासून मोनो रेल्वेच्या फेऱ्या वाढणार

93

सामना ऑनलाईन । मुंबई

मोनो रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा देखील सुरू झाला आहे. चेंबूर ते जेकब सर्कल म्हणजेच सातरस्त्यापर्यंत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मोनो रेल्वेच्या फेऱ्या सुरू असतात. दोन गाड्यांमधील अंतर हे 22 मिनिटांचे असते. ज्यामुळे प्रवाशांना एक मोनो गेली की दुसरी येईपर्यंत बराच वेळ वाट पहावी लागते. दोन मोनो रेल्वे गाड्यांमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी आणखी 2 मोनो रेल्वे एप्रिल महिन्यापासून रुळावर आणण्यात येणार आहे. यामुळे दोन मोनोमधील अंतर हे 15 मिनिटांचे होणार आहे.

मोनोच्या ताफ्यात सामील होणाऱ्या दोन गाड्यांपैकी पहिली गाडी या महिन्याच्या अखेरीस दाखल होणार आहे, तर दुसरी गाडी एप्रिलमध्ये येणार असून ती राखीव म्हणून ठेवण्यात येणार आहे. ऐनवेळी एखाद्या गाडीत बिघाड झाल्यास पर्यायी उपाय योजना म्हणून ही गाडी राखून ठेवली जाणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव यांनी सांगितले आहे.

चेंबूरपासून महालक्ष्मीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी सुरुवातीला 90 मिनिटे लागत होती. मात्र आता दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर यासाठी अवघी 30 मिनिटे लागत आहेत. त्यामुळे मोनोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या पुर्वी उबेरने हाच प्रवास करण्यासाठी वेळ आणि पैसेही जास्त खर्च होत होता परंतू मोनोमुळे परवडणारा आणि आरामदायी प्रवास होत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी सुट्टी असूनही या मार्गावरून 23 हजार 321 जणांनी या मार्गावरून प्रवास केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या