ऊनपावसाचा ’36’चा आकडा! पावसाने घेतली मुंबईकरांशी कट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यात म्हणावा तितका पाऊस झालेला नाही. ऐन पावसाळ्यातही डोक्यावर सूर्य तळपत आहे. त्यातच मुंबईच्या आर्द्र हवामानाची भर पडली असून शुक्रवार हा जुलै महिन्यातला सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. शुक्रवारी मुंबईचं तापमान जवळपास 36.2 अंश सेल्सिअस इतकं होतं.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दोन आठवड्यांपूर्वी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला चांगलीच हूल दिली आहे. पुढील आठवडाही पावसाविनाच जाणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. गेला आठवडाभर पाऊस न कोसळल्याने सर्वत्र उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी या तापमानाने जुलै महिन्यातला उच्चांक गाठला आणि मुंबईकर पार घामाघूम झाले. शुक्रवारी मुंबईचं तापमान 36.2 अंश सेल्सिअस इतकं होतं. हे तापमान मुंबईच्या जुलै महिन्याच्या तापमानाच्या इतिहासातला सर्वोच्च तापमान आहे. यापूर्वी 1960मधील जुलै महिन्यात नोंदवलेलं 34.8 अंश सेल्सिअस हे तापमान सर्वाधिक मानलं जातं होतं

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पावसाची हुलकावणी पुढील आठवड्यात थोडी कमी होणार आहे. 23 जुलैपासून पाऊस पुन्हा थोडीफार हजेरी लावून 26 जुलैच्या आसपास पुन्हा कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.