लग्नानंतर 3 महिन्यांत बहिणींनी सासरी मारला डल्ला, दागिने आणि 7 लाख रुपये घेऊन फरार !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्न करून सासरीच दरोडा घालणाऱ्या दोन तरुणींची माहिती उघड झाली आहे. ग्वाल्हेर शहरात ही घटना घडली आहे.

ग्वाल्हेरमधील बिलौआ येथे राहणारे नागेंद्र जैन हे कापड व्यावसायिक आहेत. डिसेंबर 2020 मध्ये त्यांच्या दोन लहान भावांपैकी दीपक जैनचे लग्न नंदिनी मित्तलसोबत आणि सुमित जैनचे लग्न रिंकी मित्तल हिच्यासोबत लावून दिले. नंदिनी आणि रिंकी या दोघीही सख्या बहिणी असून त्यांचा भाऊ संदीप मित्तल यांनीच त्यांचे लग्न ठरवले होते. त्यांच्याच समाजातील बाबुलाल जैन यांनी हे स्थळ त्यांच्या भावांसाठी आणले होते.

लग्नानंतर नंदिनी आणि रिंकी फक्त 15 ते 20 दिवसच सासरी राहिल्या त्यानंतर त्या माहेरी निघून गेल्या. 9 जानेवारी 2021 ला संदीप मित्तल आणि आकाश मित्तल यांच्यासोबत त्या सासरी आल्या.

सासरी आल्यानंतर काही वेळ त्या दोघीही एका खोलीत त्यांच्या सासऱ्याशी काही वेळ बोलत होत्या. त्यानंतर सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. सासऱ्यांच्या तेराव्याच्या दिवशी या दोघी बहिणी तब्येत बरी नसल्याचे नाटक करून पुन्हा माहेरी निघून गेल्या.

बरेच दिवस गेले तरी त्या सासरी परतल्या नाहीत, तेव्हा सासरकडच्यांना शंका आली आणि त्यांनी या दोघी बहिणी ज्या खोलीत बोलत बसल्या होत्या त्या खोलीची पडताळणी केली तेव्हा लक्षात आले की, दोघींनी मिळून 7 लाखांचे दागिने आणि 8 लाख रुपये चोरून नेले आहेत.

सासरकडच्यांना त्यांनी केलेल्या चोरी शोध लागल्यावर त्यांनी बऱ्याचदा दोन्ही बहिणींना माहेरी बोलवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्या दोघीही परत आल्या नाहीत. तेव्हा त्यांचे सोशल मीडियाद्वारे त्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता कळले की, त्या दोघींचे आधीच लग्न झालेले आहे. नंदिनीला एक मूलही असून तिचे फेसबुक आयडी नंदिनी प्रजापती आणि टीना यादव या नावाने आहेत. तसेच रिंकी मित्तलच्या फेसबुक आयडीवर तिचे नाव रिंकी प्रजापती हे आहे.

तसेच त्यांचा भाऊ संदिप मित्तलने संदिप शर्मा आणि त्याची पत्नी रिना मित्तलच्या फेसबुक आयडीवर रिना चंदेल आणि त्यांचा दुसरा भाऊ आकाश मित्तलच्या आयडीवर आकाश अशा खोट्या नावाने या सगळ्यांनी स्वत:चे फेसबुक आयडी तयार केले आहेत.

पीडित व्यावसायिकाने सांगितले की, त्या नंदिनी, रिंकी, संदिप, आकाश, रिना आणि बाबूलाल जैन या सहा जणांवर लग्नाच्या बहाण्याने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. दोघी बहिणींविरुद्ध उज्जैन येथे यापूर्वीच एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.