
सामना प्रतिनिधी । केज
केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय ताकतोडे या तरुणाने मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जवळील बिंदुसरा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याला न्याय द्या, मातंग समाजाच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी करत त्याच्या नातेवाईकांनी व समाज नेत्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. मात्र पालकमंत्री व आमदार संगीता ठोबरे, आदींनी आश्वासन देताच अखेर ७२ तासानंतर संजय ताकतोडेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत तरूणाच्या वारसांना २५ लाख रुपये नुकसानभरपाई आणि एका व्यक्तीला नोकरी द्यावी, मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे या व इतर मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यविधी केला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी व समाज नेत्यांनी घेतला होता. तसे निवेदन नातेवाईकांनी नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना बुधवारी रात्री दिले होते. गुरुवारी दुपारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दहा लाख रुपये शासकीय मदत देण्याची घोषणा केली. केज मतदार संघाच्या आमदार संगीता ठोबरे, रमेश आडसकर व हारुन इनामदार यांनी मध्यस्थी केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून वारसांना १० लक्ष रुपयांचे पत्र तसेच गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मदत निधीमधून २ लक्ष रुपयांची मदत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केली. आमदार ठोबरे यांच्याकडून १ लक्ष रूपये देण्याची घोषणा करण्यात आली तसेच इतर मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग करून देण्याचे आश्वासन मिळताच आज गुरूवारी सायंकाळी ५वाजता येथील स्मशानभूमीत संजय ताकतोडे यांच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी लहुजी सेनचे प्रदेशाध्यक्ष खंदारे व पदाधीकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.































































