चाकरमान्यांचा ट्रॅफिक जाममध्येच ‘मोरया’, मुंबई-गोवा महामार्गावर फुल टू वाहतूककोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चौपदरीकरणाचे रडतखडत सुरू असलेले काम, त्यातच ठिकठिकाणी खड्डय़ांचे ‘विघ्न’.. यामुळे आज मुंबई-गोवा महामार्गावर फुल टू टॅफिक जाम झाले. खारपाडा, नागोठणे, माणगाव तसेच महाडजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंगीच्या पावलाने वाहने पुढे सरकत असल्याने पाच मिनिटांच्या प्रवासाला तब्बल दोन-दोन तास रखडपट्टी होत होती. त्यामुळे बाप्पाच्या स्वागताच्या ओढीने गावाची वाट धरलेल्या हजारो चाकरमान्यांचा वाहतूककाsंडीतच ‘मोरया’ झाला.

कोकण आणि गणेशोत्सव याचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी न चुकता चाकरमानी आपल्या गावाक जातात. ट्रेन, खासगी बसेस, वाहने तसेच एसटीने कोकणचा रस्ता धरतात. बाप्पाच्या आगमनापूर्वी तीन दिवस यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मात्र या महामार्गाच्या चौपदरीकरणात झालेल्या ढिलाईने गेल्या काही वर्षांत यात अधिकच भर पडली आहे. दरवर्षीप्रमाणे खारपाडा, नागोठणे, वाकण, कोलाड, इंदापूर आणि माणगाव या ठिकाणी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. दुसरीकडे महामार्गावरील खड्डे दुरुस्तीची मुदत संपली तरी खड्डे दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झाले नव्हते. ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांच्या विघ्नामुळे गणेशभक्तांना मनस्ताप सहन करावा लागला.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

नागोठणे ते इंदापूर या पट्टय़ात अत्यंत धिम्यागतीने वाहतूक सुरू होती. पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तासांचा वेळ लागत होता. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुकीचे नियमन सुरळीत राहावे म्हणून वाहतूक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात होता. पण वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने त्यात फारसे यश येत नव्हते.