गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती बाप्पांची दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर गुरुवारी गुलालाची उधळण करत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत मुंबईकरांनी सार्वजनिक आणि घरगुती लाडक्या बाप्पांना निरोप दिला. भरपावसातही वाजत-गाजत लाडक्या बाप्पाला गिरगाव, दादर, माहीम, जुहू, अक्सा या मोठय़ा चौपाटय़ांसह 200 हून जास्त नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांत निरोप देण्यात आला. भक्तीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांसह सर्वसामान्यांनी कुटुंबकबिल्यासह गर्दी केली होती. मुंबईतील मानाचा ‘लालबागचा राजा’, गणेशगल्लीचा ‘मुंबईचा राजा’, ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’, ‘काळाचौकीचा महागणपती’, नरे पार्कमधील ‘परळचा राजा’ या बाप्पांची राजेशाही मिरवणूक पाहायला परळ-लालबागमध्ये मुंबईकरांसह देशीविदेशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, मुंबईत आज पहाटेपर्यंत दहा दिवसांच्या 39 हजार 758 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

मुंबईत आणि कोकणात दरवर्षी गणेशोत्सव मोठय़ा धूमधडाक्यात साजरा होतो. मुंबईत मंडळाची उंच मूर्ती, आकर्षक देखावे भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त मुंबईत येत असतात. विघ्नहर्ता श्री गणेशाची यंदा 19 सप्टेंबरला घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दोन लाखांहून अधिक घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज झाली होती.

दीड, पाच आणि सात दिवसांच्या  2 लाख 32 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन!

गणेशोत्सवादरम्यान दीड, पाच आणि सात दिवसांच्या बाप्पांसह गौरींचे मोठय़ा उत्साहात विसर्जन करण्यात आले. दीड, पाच व सात दिवसांच्या एकूण 2 लाख 31 हजार 586 गणेशमूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. यात नैसर्गिक विसर्जनस्थळी 1 लाख 65 हजार 964 तर 200 कृत्रिम तलावात 65 हजार 604 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

10 दिवसांच्या बाप्पासह गौरींचेही विसर्जन!

गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या गणपती बाप्पांचे विसर्जन आज सकाळपर्यंत सुरू होते. यात सार्वजनिक 6 हजार 951 आणि घरगुती 32 हजार 345 गणेशमूर्ती तर 462 गौरी अशा एकूण 39 हजार 758 मूर्तींचा समावेश आहे. यात कृत्रिम तलावांत सार्वजनिक 740, घरगुती 10 हजार 207 आणि 160 गौरींचे विसर्जन करण्यात आले.

एकाच वेळी सर्व मोठय़ा बाप्पांचे होते दर्शन

गणेशगल्लीचा ‘मुंबईचा राजा’, ‘लालबागचा राजा’, ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’, ‘काळाचौकीचा महागणपती’, तेजुकाया, नरे पार्कचा ‘परळचा राजा’, लाल मैदान या परळ-लालबागमधील गणपतींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर केले जाते. या बाप्पांची राजेशाही मिरवणूक लालबागच्या पुलाखालून चिंचपोकळीमार्गे गिरगाव चौपाटीला जाते. त्यामुळे लालबागमध्ये सर्व बाप्पांचे दर्शन होत असल्यामुळे भाविक लालबाग पुलाखाली आणि पुलावर दुपारपासून ठाण मांडून बसले होते. बाप्पाची एक झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी देशीविदेशी कॅमेरामनही उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत गर्दीवर नियंत्रण ठेवले.

पोलिसांचा जागता पहारा, गणेशोत्सव निर्विघ्न

यंदाचा गणेशोत्सव पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि मार्गदर्शनाखाली कुठल्याही विघ्नाविना मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. विशेष म्हणजे लालबाग, परळ परिसरात मुंबई पोलिसांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. दहा दिवस लालबाग, परळ भागात भक्तांचा अक्षरशः सागर उसळला होता. पण पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, उपायुक्त प्रशांत कदम व पथकाने दिवसरात्र खडा पहारा देत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही. परिणामी लालबाग परिसरात तोबा गर्दी होऊनही सर्वकाही सुरळीत पार पडले. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून प्रशंसा होत आहे.

पुण्यात पावसामुळे मिरवणूक 30 तास लांबली

प्रसन्न सकाळ, रस्त्यावर दुतर्फा रांगोळ्यांच्या पायघडय़ा, गालिच्यांनी सजलेले चौक, सनईचे मंगलसूर, ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट अशा भारावलेल्या वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता वैभवशाली मिरवणूक मोठय़ा थाटात निघाली. दुपारी तीननंतर फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पुष्पवृष्टी सुरू असताना वरुणराजाही विजांच्या कडकडाटात अवतरले. गेले दहा दिवस गणरंगात रंगून गेलेल्या गणेशभक्तांना वरुणराजानेही चिंब केले. मुसळधार पावसात भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही, तब्बल आठ तासांहून अधिक वेळ सुरू असलेली ‘कृपावृष्टी’ आणि बाप्पाची ‘कृपादृष्टी’ याची अनुभूती भाविकांनी घेतली. ‘निरोप देतो बाप्पा आता आज्ञा असावी, गणपती बाप्पा मोरया, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…’ अशा भावुक मनःस्थितीत भाविकांनी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. यंदा तब्बल 30 तास 25 मिनिटे मिरवणूक सुरू होती. शेवटच्या गणपतीचे दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी विसर्जन झाले.

शिवसेना शाखा क्र. 66 च्या उपशाखा संघटक उर्मिला वाल्मिकी यांचे पती  रमेश गोविंदाअप्पा यांचे निधन झाले. त्यांची मुलगी प्रगती हिच्या शिक्षणाची जबाबदारी दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख व अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांनी घेतली. त्या अनुषंगाने त्यांच्या अध्यक्षतेखालील विलेपार्ले जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने प्रगती हिला 51 हजारांचा धनादेश खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या हस्ते दिला. यावेळी विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन, प्रसाद आयरे, मंडळाचे कार्याध्यक्ष संजय साखळे उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे गिरगावात गणेशभक्तांना 50 हजार वडापाव वाटप 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघालेल्या उंचच उच गणेशमूर्ती पाहण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह राज्यभरातून असंख्य गणेशभक्त गिरगावात दाखल होतात. गिरगावात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तब्बल 50 हजार वडापावचे विनामूल्य वाटप करण्यात आले.  शिवसेना शाखा क्र. 221 च्या वतीने शाखा समन्वयक अभिजित गुरव व निलेश कळवणकर यांच्या वतीने गिरगावात विनामूल्य वडापाव वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी दिनेश कळवणकर, अजय पेढे, अनिल जाधव, दिलीप करंदीकर, सचिन माने यांचे सहकार्य मिळाले. यावेळी माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळदेखील उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष व युवासेना सहसचिव मयूर कांबळे यांच्यामार्फत सालाबादप्रमाणे याही वर्षी अनंत चतुर्दशीनिमित्त गणेशभक्तांना कोल्ड्रिंक्स आणि आईक्रीम वाटप करण्यात आले. हजारो गणेशभक्तांनी याचा लाभ घेतला.  या कार्यक्रमास पवन जाधव, उर्मिला पांचाळ, हरदीपसिंग लाली, सुनीता आयरे, मालन कदम, प्रशांत घाडीगावकर, रवी घोले, स्वामी जावळे, मोहम्मद हुसैन, सरिता मांजरे, स्मिता वाडेकर, आशा उडेशी, प्रमिला गुरखे, पार्वती इंगळे, सुनीता बाली यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

साकीनाक्यात मोफत पाणीवाटप

साकीनाका चांदिवली विभागात विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेशभक्तांना माजी नगरसेविका चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या वतीने बिसलेरी बॉटलचे वाटप करण्यात आले. विभागप्रमुख, आमदार ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी उपविभागप्रमुख भास्कर पाटील, अण्णामलई, विभाग उपसंघटिका प्रमिला चव्हाण, शाखा संघटिका भारती पाटील, सोमनाथ सांगळे व मनोज (बालाजी) सांगळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.