गारगोटीत शासकीय जमिनीवरील अतिक्रमण जमीनदोस्त, पोलिसांच्या मोठय़ा बंदोबस्तात महसूलची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गारगोटी येथील मुख्य ठिकाणी शासकीय जमिनीवर गेल्या 20 वर्षांपासून असलेले अतिक्रमण आज दिवसभरात महसूल विभागाने जमीनदोस्त केले. आज पहाटे 6 वाजेपासून महसूल विभागाने ही मोहीम राबविली. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

गारगोटी येथे एसटी स्टॅण्ड ते स्टेट बँक या मुख्य रस्त्यावर 95 गुंठे इतके क्षेत्र महसूल, सरकार हक्क, उपविभागीय अधिकारी या नावावर नोंद आहे. परंतु, गेल्या 20 वर्षांपासून या मोकळ्या जागेवर विविध दुकाने, खोकी टाकून काहींनी व्यवसाय सुरू केला होता, तर काहींनी या मोकळ्या जागेत झोपडय़ा बांधल्या होत्या. विशेषतः भंगार गोळा करणारी कुटुंबे या जागेत राहत होती.

शासकीय जागा असल्याने येथे गारगोटी – आजरा उपविभागीय कार्यालयाच्या (प्रांत कार्यालय) इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शिवाय नजीकच्या काळात या जागेवर भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीचे बांधकामही होणार आहे. ही 95 गुंठे जागा शासकीय असली तरी गेल्या 20 वर्षांपासून अनेकांनी अतिक्रमण करून त्यावर ठाण मांडले होते. या जागेवर लहान मोठी 33 दुकाने होती. या व्यावसायिकांना अनेकदा महसूल विभागाने अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा पाठविल्या होत्या, पण त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले होते. याप्रकरणी न्यायालयात खटला चालू होता.

न्यायालयाने नुकताच महसूलच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर महसूल विभागाने तेथील लोकांना अतिक्रमण काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. पण, याकडे पुन्हा दुर्लक्ष केल्याने आज महसूल विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात पहाटे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.

यावेळी किरकोळ विरोध झाला, पण त्याला महसूल विभागाने दाद दिली नाही. अतिक्रमण दिवसभर पूर्णतः हटविल्यानंतर अगदी सायंकाळी अंधार झाल्यानंतर ही मोहीम थांबविण्यात आली. या वेळी आजरा-भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गारगोटीचे मंडळ अधिकारी रामदास लांब, तलाठी दत्तात्रय झंजे यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. भुदरगडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

महसूलच्या जागेवरच अतिक्रमण

गारगोटी शहरातील ही मोक्याची जागा असून, हे क्षेत्र 95 गुंठे आहे. ही महसूल खात्याची जागा आहे आणि याच जागेवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने हे क्षेत्र दिसून येत नव्हते. पण, आज या जागेवरील अतिक्रमण हटविल्याने प्रचंड मोठी जागा दिसून येत आहे, या जागेने आता मोकळा श्वास घेतला आहे.