अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य, लोकपाल विधेयक अंतिम टप्प्यात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे विविध मागण्यासंदर्भात 30 जानेवारीपासून उपोषण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन त्यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. अण्णांनी केलेल्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याने अण्णा उपोषणाचा निर्णय घेणार नाहीत, अशा आशावाद महाजन यांनी व्यक्त केला. अण्णांची प्रमुख मागणी असलेल्या लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.

स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा आणि पिकांना दीडपट हमीभाव देण्याबाबत सरकारने सकारात्मक पावले उचलल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. याशिवाय, पाण्याचा प्रश्न लक्षात घेता राज्यात ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर वापरासाठी प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे. शेतीविषयक कामांसाठी लागणाऱ्या वस्तूंवरील कर 18 टक्क्यांवरुन 12 टक्के इतका करण्यात आला आहे. अण्णांची मागणी तो 5 टक्के करण्याची आहे. जीएसटी कौन्सिल निश्चितपणे त्याबाबत पावले उचलेल.

केंद्र शासन स्तरावरुनही पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी अण्णांच्या मागण्यांबाबत लेखी पत्र अण्णांना दिले आहे. महाजन यांनी ते पत्र अण्णांकडे सुपूर्त केले. अण्णांच्या लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसंदर्भात मागणी आहे. केंद्र सरकारने त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु केली आहे. समितीची स्थापना, विधी अधिकारी नियुक्ती आदी बाबी पूर्ण झाल्या आहेत. लवकरच लोकपाल नियुक्ती झालेली दिसेल, असे ते म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णांचे काम मोठे आहे आणि लोकपाल संदर्भात त्यांचा पाठपुरावा आहे, असेही त्यांनी नमूद केले.