सीएम चषकाला गालबोट, नाचता नाचता मुलीचा स्टेजवरच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कांदिवलीत आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषकाच्या डान्स स्पर्धेत अनिशा शर्मा ही 12 वर्षांची मुलगी स्टेजवर नाचता नाचता कोसळली आणि तिथेच मृत्युमुखी पडली. अनिशाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला असून परिसरावर शोककळा पसरली आहे.

कांदिवली पश्चिम येथील एकता नगरात भाजपचे नगरसेवक कमलेश यादव यांनी मंगळवारी सीएम चषक स्पर्धा आयोजित केली होती. यातील नृत्य प्रकारात अनिशाने भाग घेतला होता. दुपारी दीड वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. सायंकाळी 5च्या सुमारास अनिशाला नृत्य करायची संधी मिळाली. ती अत्यंत उत्साहात नाचत होती. स्पर्धेत सहज जिंकेल, असा तिचा डान्स होता. मात्र डान्स सुरू असताना ती अचानक थांबली आणि कोसळली. प्रेक्षकांनाही काय झाले ते कळण्यास काही क्षण लागले, मग सारेच धावले. तिला उपस्थितांनी कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, आज तिच्यावर कांदिवलीच्या डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

डान्सच्या स्पर्धेमुळे अनिशा खूप आनंदात होती. स्पर्धेला जाण्यापूर्वी ती ‘जीत के आऊंगी, पप्पा का नाम रोशन करुंगी,’ असे म्हणाली होती. पण ती घरी परत आलीच नाही, असे अनिशाचे वडील भरत शर्मा यांनी सांगितले. अनिशा एकता नगरच्या खासगी शाळेत इयत्ता 7वीत शिकत होती. तिला तीन बहिणी असून वडील सलून चालवतात.

अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट
अनिशाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नेंद केली असून तपास सुरू असल्याचे सांगितले. प्राथमिक तपासणीत अनिशाने डान्स करायच्या चार तास आधी खाल्ले होते. तसेच तिच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते, असे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच अनिशाचा मृत्यू कशामुळे झाला ते समजू शकेल, असे कांदिवली पोलिसांनी सांगितले.