
मंदिरांच्या जमिनीचा, मालमत्तेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा देवताच मालक म्हणून संबोधली जायला पाहिजे. मंदिरांच्या मालमत्तेचा मालक देवच आहे, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पुजारी हा सेवक आहे. तो केवळ पूजा करतो आणि मालमत्तेचे व्यवस्थापन पाहतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मध्य प्रदेश सरकारने पुजाऱयांनी मंदिरांची मालमत्ता विकू नये म्हणून दोन अध्यादेश काढले होते. तसेच महसूल विभागाच्या नोंदींमधून पुजाऱयांची नावे काढण्याचे जाहीर केले होते. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे हे दोन्ही अध्यादेश बरखास्त केले. त्याविरुद्ध मध्यप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुजाऱयांनी मंदिराच्या मालमत्तेवर हक्क असल्याचा दावा केला होता. यावर आज सुनावणी झाली.
न्यायालय काय म्हणाले…
महसुली दाखल्यांमध्ये मालमत्तादार या रकान्यामध्ये केवळ देवतेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. कारण कायद्याच्या दृष्टीने त्या जमिनीची मालकी त्या देवतेचीच असते.
पुजारी हा केवळ सेवक असून, तो देवतांची सेवा करतो. बराच काळ विविध उत्सव व कार्य जरी सेवकांनी केले असले, तरी त्याला मंदिराच्या मालमत्तेवर स्वतंत्र मालकी हक्क मिळत नाही.

























































