जादूटोणा करण्यासाठी महिलेकडून ५० लाख लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

तांत्रिक-मांत्रिकांविरुद्ध कितीही कायदे बनविण्यात आलेले असले तरी भोंदूबाबांकडून लोकांना फसविण्याचे प्रकार काही बंद झालेले नाहीत. उलट घरात व घराभोवती लिंबू-मिरच्या, काळे धागे बांधून, कोंबडी, बोकडांची मुंडकी कापून अजूनही अंधश्रद्धा जोपासली जात आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या एका महिलेला सांताक्रुझला राहणाऱ्या विशाल पाटणे (३५) या भामट्याने ५० लाखांना गंडा घातल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.

टिळकनगर येथे राहणारी सुखविंदर सिंग नुरी (३६) ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. त्या महिलेला पतीपासून धोका आहे, तो तुला कधीही जीवे ठार मारू शकतो, अशी भीती दाखवून विशाल पाटणे या मांत्रिकाने तिला हे सर्व टाळायचे असेल, तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर मी सांगतो तसे कर. नाहीतर तुझा अंत अटळ आहे असे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या नुरीने पाटणेने सांगितले तसे केले. कोंबडी, बोकड कापले. लिंबू-मिरच्या घराभोवती लावल्या. हे सर्व विधी पार पाडण्यासाठी पाटणेने नुरीकडून तब्बल ५० लाख रुपयांपेक्षाही अधिक रक्कम उकळली. आपण फसले गेलो आहोत असे लक्षात आल्यावर त्या महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी तपास करून विशाल पाटणेला अटक केली.