कांदळगावचे देव रामेश्वर गावभेटीला ! त्रैवार्षिक डाळपस्वारी सोहळा उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक वर्षांची परंपरा जोपासत कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर देव तरंगासह आणि लवाजम्यासह त्रैवार्षिक डाळपस्वारी उत्सवानिमित्त गावभेटीवर निघाले आहेत. मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील ऐतिहासिक श्री देव रामेश्वर मंदिराच्या डाळपस्वारी उत्सवास सुरुवात झाली आहे. मानकरी व गावकरी रामेश्वर मंदिरात जमा होत गावभेटीवर निघण्यासाठी श्री देव रामेश्वरास गाऱ्हाणे घालण्यात आले.

पालखीत श्री देव रामेश्वराचा मुखवटा ठेवत पालखी सजविण्यात आली होती. गाऱ्हाणे केल्यानंतर मंदिरासमोरील मांडावर वारेसुत्र (तरंग) उभे राहिल्यावर श्री देव रवळनाथाला गाऱ्हाणे करण्यात आले. यानंतर पालखीत बसून देव तरंगासह ढोल ताशांच्या गजरात रामेश्वर गावभेटीसाठी रवाना झाले. श्री देव रामेश्वराच्या डाळपस्वारी उत्सवानिमित्त कांदळगाव- ओझर ते कोळंब या मार्गावर ग्रामस्थानी ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गुढ्या उभारल्या होत्या, तसेच पताकाही लावण्यात आल्या होत्या. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या व रंगरंगोटी करण्यात आली होती.

श्री देव रामेश्वर गावभेटीला रवाना झाल्यावर कांदळगाव येथील कमरा देवीची भेट घेतल्यावर सीमेकडे निघाला. यावेळी श्री देव गांगेश्वराने रामेश्वराला भेट देत तो देव तरंगासह कोळंब येथे श्री देव खापरेश्वर येथे सीमा बांधण्यास गेला. ग्रामस्थांना दर्शन देत निघालेल्या श्री देव रामेश्वर व पंचायतनचे ओझर व कोळंब येथे स्वागत करण्यात आले. यावेळी कोळंब येथे श्री देव गांगेश्वराने पुन्हा रामेश्वराची भेट घेतली. यानंतर सायंकाळी कोळंब मांगेरी देवस्थान येथे श्री देव रामेश्वर वस्तीला थांबला. याठिकाणी रात्रभर मुक्काम केल्यानंतर देव रामेश्वर पुन्हा मार्गस्थ होत न्हीवे येथील श्री ब्राह्मणदेवास भेट दिली. हा उत्सव पाच दिवस चालणार आहे.