महात्मा गांधी, समर्थ व्यायाम मंदिरला विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। गोरेगाव

गोरेगावच्या प्रबोधन क्रीडाभवन येथे बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यताप्राप्त व मुंबई उपनगर खो-खो संघटनेच्या विद्यमाने व प्रबोधन क्रीडाभवन यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या 32 व्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेत पुरुष विभागात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. ऍकॅडमी व महिला गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर यांनी विजेतेपद पटकावले.

महिला गटाच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने परांजपे स्पो. क्लबचा (5-3, 4-5) 9-8 असा 1 गुणानी पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. मध्यंतराला श्री समर्थने दोन गुणांची आघाडी घेऊन सामन्यावर घेतलेली पकड उत्तरार्धात कायम राखली. समर्थच्या बिनीच्या खेळाडू अनुष्का प्रभू (2.10 मि., 3 मि. व 1 गडी), साजल पाटील (4.10 मि., 2.40 मि. नाबाद व 2 गडी) व भक्ती धांगडे (2.10 मि., 2.30 मि. व 1 गडी) या विजयाच्या शिल्पकार होत्या. पुरुषांच्या अंतिम सामन्यात बलाढय़ शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. ऍकॅडमीने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर (8-5, 10-5) 18-10 अशी 8 गुणांनी मात करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. महात्माच्या अनिकेत पोटे (2 मि. व 2 मि.), प्रतीक देवरे (2.20 मि. व 1.40 मि.) यांनी संरक्षणाची बाजू सांभाळली तर यामीन खान (4 गडी), राहुल साळुंके (3 गडी) व नितेश रुके (3 गडी) आक्रमणात चमकले. स्पर्धेतील तृतीय क्रमांक महिला गटात शिवनेरी सेवा मंडळ तर पुरुषांमध्ये अमरहिंद मंडळाने पटकावला.