
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण बंदरात बोटींना येण्या-जाण्याचा जलमार्ग खडकाळ आहे. असे असताना मत्स्य विभागाने कारवाईसाठी मालवण बंदरात आणलेला मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर रात्रौच्या वेळी पळून जातो. हा प्रकार संशयास्पद असाच असून मत्स्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनीच हायस्पीड ट्रॉलर पळवून लावला. असा गंभीर आरोप मालवणातील मच्छीमारांनी केला आहे.
दरम्यान या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. तसेच हायस्पीड ट्रॉलर पळून गेल्या प्रकरणी ट्रॉलर मालकावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी मच्छिमार नेते हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखालील मच्छीमारांनी सहायक मत्स्य आयुक्त राजकुमार महाडिक यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्गच्या (महाराष्ट्र) सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या मलपी येथील एक हायस्पीड मासेमारी ट्रॉलर मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेने रविवारी सायंकाळी पकडला. त्या ट्रॉलरवर लाखो रुपये किमतीची मासळी होती. रविवारी रात्री खलाशी व तांडेल यांच्यासह मत्स्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मालवण बंदरात ठेवण्यात आलेला हायस्पीड ट्रॉलर मध्यरात्री पळाला. याप्रकरणी मच्छिमार संतप्त झाले असून ट्रॉलरवर असलेले मत्स्य अधिकारी प्रदीप वस्त यांनीच ट्रॉलर पळवून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मालवणातील मच्छीमारांनी
मच्छिमार नेते हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य कार्यालयात धडक देत सहाय्यक मत्स्य आयुक्त राजकुमार महाडिक यांना धारेवर धरले. मत्स्य अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे परराज्यातील मासेमारी बोटी मासळीची लूट करत असल्याचा आरोपही मच्छीमारांनी केला. यावेळी बाबी जोगी, विकी तोरसकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, संतोष देसाई, बाबू आचरेकर, संमेश परब यांच्यासह दांडी, वायरी, धुरीवाडा येथील मच्छिमार उपस्थित होते.
मत्स्य अधिकारी दोन दिवस बेपत्ता ?
रविवारी रात्री हायस्पीड ट्रॉलर पळाला. त्यावेळी त्या बोटींवर कारवाई करण्यासाठी मत्स्य अधिकारी प्रदीप वस्त उपस्थित होते. मात्र त्यांनंतर वस्त हे मंगळवार सकाळ पर्यंत बेपत्ता होते. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करा. अशी मागणी मच्छीमारांनी केली. मात्र दुपारी उशिरा प्रदीप वस्त मत्स्य कार्यालयात उपस्थित झाले.

























































