इंग्रजीचा वापर महागात पडला! एसटीच्या अधिकाऱ्यांना दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य सरकारच्या पत्रव्यवहारात राजभाषा मराठीला डावलणाऱ्या एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शासकीय पत्रव्यवहारात इंग्रजी शब्दांचा वापर केल्याबद्दल एसटीच्या अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक शंभर रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

प्रत्येक खात्यात शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा शंभर टक्के वापर करण्याबाबत आदेश असतानाही एसटी महामंडळात त्याचे पालन केले जात नव्हते. एकूण कर्मचारी स्थिती दर्शविण्याच्या पत्रात इंग्रजी भाषेचा वापर केल्याने भंडारा विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांना शंभर रुपये दंडाची शिक्षा बजावण्यात आली आहे. मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्याने ही कारवाई केली आहे. अशाच प्रकारे धुळे विभाग नियंत्रकांना पत्रात जावक क्र. व सही अवजड वाहन दुरुस्ती शाखेचे नाव इंग्रजीत लिहिल्याने दंड बजावण्यात आला आहे. जनसंपर्क अधिकाऱ्याने पत्रव्यवहारात मराठीत लिहीत नसल्याने तसेच पत्रव्यवहारानी आद्याक्षरे इंग्रजी भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहिल्याने तसेच महाव्यवस्थापक (वाहतूक) यांचे नाव इंग्रजी उच्चाराप्रमाणे लिहिल्याने जनसंपर्क शाखेचे प्रमुख म्हणून संबंधित जनसंपर्क अधिकाऱ्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.