…तर आम्ही बांगड्या घातलेल्या नाही; मंत्री गुलाबराव पाटील यांचा भाजपला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सध्या फक्त महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकश्या सुरू आहेत. भाजपमधील सगळेच जणू महामंडलेश्वर असल्याप्रमाणे वागत शिवसेनेला लक्ष्य करणार असतील, तर आम्ही बांगड्या घालून स्वस्थ बसलेलो नाही,’ असा इशारा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथे आयोजित ‘शिवसंवाद मेळाव्या’त मंत्री पाटील बोलत होते. यावेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, नगर झेडपी सदस्य संदेश कार्ले, राजेंद्र दळवी, भाऊसाहेब कांबळे, काशिनाथ दाते, तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, उपतालुकाप्रमुख पंकज लांभाते आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, भाजपमधील काही बांडगुळे रोज बेछूट गरळ ओकतात. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आता खरी वेळ आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखविता काय? पण लक्षात ठेवा, आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा केलेला अपमान प्रत्येकाच्या जिव्हारी लागणारा आहे. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केल्यानेच पहिल्या पाचमध्ये राज्याचे नाव आहे. चांगल्या कामाला भाजपची लागलेली साडेसाती हटू दे, अशी प्रार्थना शनिदेवाला केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री शंकरराव गडाख यांनी नगरमध्ये राबविलेल्या ‘शिवसंवाद’ व ‘घोंगडी बैठकी’ची माहिती देऊन, ‘जलसंधारण, दळणवळण व आरोग्यमंदिराचे काम करताना संघटनावाढीला अग्रक्रम दिला जाईल,’ असे सांगत जिल्ह्यातील 1100 बंधाऱ्यांसाठी 250 कोटींचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.

गावाच्या वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा

‘गावागावात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने काम करण्याची गरज आहे. गावात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे भूत येऊ द्यायचे नसेल, तर गावाच्या वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा,’ असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला. ‘शिवसेना हा पक्ष नाही, संघटना नाही, तर तो एक विचार आहे. शिवसेना ही मुसलमानविरोधी नसून, देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात आहे,’ असेही ते म्हणाले.