
>> गुरुनाथ तेंडुलकर
लंडनमधील एका शाळेत एक प्रयोग केला. शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर जाणाऱया विद्यार्थ्यांकडून एक फॉर्म भरून घेतला गेला. त्यांची सगळी माहिती भरून घेतली आणि पुढील आयुष्यात त्या विद्यार्थ्यांना कोण व्हावंसं वाटतं, हे लिहायला सांगितलं. हा उपाम त्या शाळेने तब्बल 25 वर्षे राबवला आणि त्यानंतर पहिल्या पाच बॅचच्या विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा बोलावून घेतलं. ते विद्यार्थी चाळिशीच्या आसपास पोहोचले होते. शाळा सोडताना फॉर्मवर लिहिलेली त्यांची स्वप्नं दाखवली. 95 टक्के विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झाली नव्हती. त्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांकडून पुन्हा एकदा फॉर्म भरून घेण्यात आला. त्यावर “तुम्ही तुमची स्वप्नं का पूर्ण करू शकला नाहीत?” असा एक प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना बहुतेक सगळ्यांनीच प्रतिकूल परिस्थिती, आई-वडिलांची भांडणं, राजकारणातील भ्रष्टाचार अशी कारणं लिहिली. त्या कारणांपैकी एक कारण होतं ‘लक’. म्हणजेच नशीब! नशिबात नव्हतं म्हणून आमचं स्वप्न पूर्ण झालं नाही, असं म्हणणाऱयांची संख्या खूपच मोठी होती. पण एकानेही “मी माझ्या स्वत:च्या नाकर्तेपणामुळे माझी स्वप्नं साकारू शकलो नाही” असं उत्तर दिलं नव्हतं.
संस्कृतमध्ये एक वचन आहे, ‘उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथा:’
भावार्थ : दरिद्री माणसांच्या मनात इच्छा उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. त्या कधीच पूर्ण होत नाहीत. इथे या सुवचनामध्ये वापरलेला ‘दरिद्री’ हा शब्द ध्यानात घ्यायला हवा. तिथे ‘गरीब’ हा शब्द वापरलेला नाही. गरीब हा परिस्थितीमुळे गरीब असू शकतो, पण दरिद्री हा स्वत:च्या कर्मामुळे दरिद्री होतो, दरिद्री राहतो.
गरीब घराण्यात जन्माला येऊन स्वत:च्या कार्यकर्तृत्वावर आणि जिद्दीवर मोठय़ा झालेल्या अनेक माणसांची उदाहरणं आपण पाहतो. आजूबाजूची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असूनदेखील केवळ मनोबलावर आणि योग्य प्रयत्नांनी परिस्थिती पालटल्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. माणसानं स्वप्नं पाहताना नेहमीच भव्यदिव्य स्वप्नं पाहावीत. मोठमोठय़ा योजना मनात आखाव्यात, पण केवळ त्या योजना मनात आखून काहीच साध्य होत नाही. त्यासाठी योग्य दिशेने पावलं उचलावी लागतात. अथक प्रयत्न करावे लागतात नाहीतर… स्वप्नं केवळ स्वप्नंच राहतात. सामान्य माणूस हा आयुष्यभर सामान्यच रहातो हे सांगणारी आजची कविता. ‘गणपत वाणी विडी पिताना’ आणि या कवितेचे कवी आपल्या सर्वांच्या परिचयाचे बा. सी. मर्ढेकर.
कवितेतला गणपत वाणी विडी ओढता मोठा बंगला बांधायचं स्वप्न पाहतो, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काहीच करत नाही. दररोजच्या जीवनात तेच तेच काम करत आयुष्यभर जिथे होता तिथेच राहतो. इथे मर्ढेकरांनी वापरलेला ‘डोळे असलेला जन्मांध’ आणि संस्कृत सुवचनातील ‘दरिद्री’ हे दोन्ही शब्द मला समानार्थी वाटतात. ज्यांचा जीवनप्रवास हा सामान्यातून अतिसामान्य या दिशेने वाटचाल करतो त्याला कर्मदरिद्री म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?
आजूबाजूला नजर टाकली तर स्वत:च्या कर्मामुळे आयुष्यभर दरिद्री राहिलेले असे अनेक गणपत वाणी आपल्याला पाहायला मिळतील. टीव्हीवरच्या चटकदार मालिका पाहणाऱया गृहिणी, वेगवेगळ्या नावाखाली वर्षभर खेळवल्या जाणाऱया ािढकेटच्या मॅच पाहणारे मध्यमवर्गीय, दिवसभर व्हॉटस्आप, इन्स्टा, फेसबुकवर डोळे लावून बसलेला तरुण वर्ग, चटपटीत-चटकदार रील्स बघत वेळेचा अपव्यय करणारा विद्यार्थी वर्ग, कारणाशिवाय मोबाइलवर तासन्तास चकाटय़ा पिटणारी माणसं… हे सगळे गणपत वाणीच असतात. त्या सगळ्यांच्या विडय़ा वेगवेगळ्या असल्या तरी वृत्ती मात्र एकच असते.
गणपत वाणी विडी पिताना
गणपत वाणी विडी पिताना, चावायचा नुसतीच काडी,
म्हणायचा अन् मनाशीच की, ह्या जागेवर बांधिन माडी
मिचकावुनि मग उजवा डोळा आणि
उडवुनी डावी भिवयी
भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसी गवयी
गिऱहाइकाची कदर राखणे जिरे,
धणे अन् धान्ये गाळित,
खोबरेल अन् तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळित
स्वप्नांवरती धूर सांडणे, क्वचित विडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा
गोणपटावर विटकररंगी सतरंजी अन् उशास पोते
आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहित होते
काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती सदैव रुतली आणिक रुतली
काडय़ा गणपत वाण्याने
ज्या चावुनि चावुनि फेकून दिधल्या,
दुकानातल्या जमीनीस त्या सदैव
रुतल्या आणिक रुतल्या
गणपत वाणी विडी बापडा पिता पिताना मरून गेला
एक मागता डोळे दोन दैव देतसे जन्मांधाला


























































