
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोडोली (सातारा) येथे टाकलेल्या छाप्यात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा हाती लागला आहे. या कारवाईत एकूण 4 लाख 95 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी गुटख्यावर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने किशोर धुमाळ यांनी एक विशेष पथक तयार केले आहे.
गोडोली (सातारा) येथील भैरोबा मंदिराशेजारी असलेल्या विराज किराणा स्टोअर्सच्या पाठीमागे एका इसमाने गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास त्या ठिकाणी जाऊन छापा टाकण्याच्या सूचना दिल्या.
त्याप्रमाणे या पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता आर.एम.डी. पान मसाला, विमल पानमसाला व व्ही-1 टॉबॅको (तंबाखू), हिरा पान मसाला वगैरे असा 4 लाख 95 हजार 570 रुपये किमतीचा प्रतिबंधीत माल (गुटखा) ताब्यात घेतला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी रोहन राजेंद्रकुमार शहा यांना कळविल्यानंतर त्यांनी समक्ष हजर होऊन ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला असून, त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस हवालदार संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, पोलीस नाईक मुनीर मुल्ला, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल मोहसीन मोमीन, वैभव सावंत यांनी ही कारवाई केली.

























































